spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानातील विशेष संकलन केंद्राचे उद्घाटन आज

नागपूर :- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी करण्यात येणाऱ्या स्वच्छतेतून निघणाऱ्या जुन्या, निरुपयोगी व वापरात नसलेल्या वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून त्यांचा पुनर्वापर व पुनर्चक्रण करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेतर्फे यंदाही ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियान राबविण्यात येत आहे. सोमवार (दि. २) रोजी पासून सुरू होणाऱ्या या अभियानांतर्गत नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये एकूण ४७ विशेष संकलन केंद्रे (दिवाळी वेस्ट डोनेशन सेंटर्स) उभारण्यात येणार आहेत. नागरिकांसाठी ही विशेष व्यवस्था ६ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

या अभियानाचा शुभारंभ सोमवार रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिका प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स येथे महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते विशेष संकलन केंद्राचे उद्घाटन करून करण्यात येणार आहे.

यावेळी उप महापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवणी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपिन, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगनंथम एम., अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनिषा अतकरे, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त गणेश राठोड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर,मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. गजेंद्र महल्ले, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

दिवाळीनिमित्त नागरिकांकडून घरांची साफसफाई केली जाते. या स्वच्छतेदरम्यान मोठ्या प्रमाणात जुन्या, निरुपयोगी तसेच वापरात नसलेल्या वस्तू बाहेर काढल्या जातात. अशा वस्तू रस्त्यांवर, मोकळ्या जागेत किंवा नियमित कचरा संकलन केंद्रांवर अस्ताव्यस्त न टाकता त्यांचे योग्य संकलन व व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. आपले शहर हे देखील आपले घरच आहे, या भावनेतून शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक राखण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.

या विशेष संकलन केंद्रांवर नागरिकांना घरातील वापरात नसलेल्या व टाकाऊ वस्तू जमा करता येणार आहेत. यामध्ये जुने कपडे, पुस्तके, खेळणी, पुनर्वापरयोग्य वस्तू, घरगुती वापरातील निरुपयोगी साहित्य तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा समावेश असेल. संकलित वस्तूंचे योग्य वर्गीकरण करून पुनर्वापरयोग्य वस्तूंचा पुनर्वापर, पुनर्चक्रणयोग्य साहित्याचे पुनर्चक्रण तसेच उर्वरित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील दहाही झोनमध्ये झोननिहाय व प्रभागनिहाय एकूण ४७ संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील जवळच्या केंद्रावर घरातील जुन्या व निरुपयोगी वस्तू जमा करता येणार आहेत. ही केंद्रे २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत कार्यरत राहतील.

नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून घरातील वापरात नसलेल्या वस्तू रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता जवळच्या विशेष संकलन केंद्रावर जमा कराव्यात. वस्तूंचा पुनर्वापर, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर नागपूर घडविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Popular Articles