spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रब्बी पेरणीचे नियोजन करा

– गव्हाऐवजी हरभरा, ज्वारी, मोहरी व जवस पिकांची निवड करण्याचे तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांचे आवाहन

कुही :- यंदा अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा ताळेबंद तयार करूनच रब्बी हंगामातील पेरणीचे नियोजन करावे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन कुहीचे तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी केले आहे.

कुही तालुक्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा आणि गहू या पिकांची लागवड केली जाते. मात्र, यंदा अल्प पावसामुळे पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने गव्हाऐवजी कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांची निवड करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. गहू पिकाला साधारणतः पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या आवश्यक असतात. याउलट हरभरा, रब्बी ज्वारी, मोहरी आणि जवस या पिकांना परिस्थितीनुसार एक किंवा दोन पाण्याच्या पाळ्यांमध्ये उत्पादन घेणे शक्य होऊ शकते.

पाण्याचा अंदाज घेऊनच पेरणी क्षेत्र निश्चित करा

शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी जमिनीतील उपलब्ध ओलावा, विहिरी आणि बोअरवेल मधील पाणीसाठा यांचे योग्य मूल्यमापन करावे. त्यानुसार रब्बी पिकांचे क्षेत्र निश्चित करावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा (मल्चिंग) वापर करावा, तसेच पिकांचे अवशेष आणि पालापाचोळ्याचा योग्य वापर करावा, असेही कृषी विभागाकडून सुचविण्यात आले आहे.

धान काढणीनंतर दुहेरी पीक पद्धतीला संधी

धान पिकाची काढणी झाल्यानंतर उपलब्ध जमिनीतील ओलावा आणि पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन दुहेरी पीक पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो. यासाठी रब्बी ज्वारी, मोहरी यांसारखी पिके उपयुक्त ठरू शकतात. यामुळे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून रब्बी हंगामाचे नियोजन करता येईल.

रब्बी ज्वारीच्या बियाण्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करा

रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारीचे बियाणे मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी केले आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन, कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड आणि आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर केल्यास रब्बी हंगामातील संभाव्य नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.

Popular Articles