– मेंढेगाव येथे कारवाई; लाकूड ठेकेदाराविरुद्ध वनगुन्हा दाखल, वाहनही जप्त
हंसराज,भंडारा :- वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पवनी वनपरिक्षेत्रातील मौजा मेंढेगाव येथे अवैधरित्या साठवून ठेवलेले खैर प्रजातीचे सुमारे दोन टन लाकूड जप्त केले. ही कारवाई ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी व त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. याप्रकरणी बेटाळा येथील लाकूड ठेकेदार कमलाकर बारसागडे यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अवैध लाकडाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही वनविभागाने जप्त केले आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी व्ही. के. नागदेवे यांनी दिली.
वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड, लाकडांची अवैध वाहतूक, उत्खनन, अतिक्रमण अथवा अवैध शिकारीचे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या वनाधिकारी किंवा वनकर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. तसेच वनविभागाच्या १९२६ या फॉरेस्ट हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी यांनी केले आहे.








