– जवाहरनगरजवळील गावात शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ला; नागरिकांत भीती
हंसराज,चिचोली :- जवाहरनगरजवळील चिचोली गावात वाघाच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेतकरी पवन घुले यांच्या शेतातील गोठ्यात रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या गोठ्यात एक गाय आणि दोन बैल बांधलेले होते.
सकाळी घुले गोठ्यात पाहणीसाठी गेले असता गाय मृतावस्थेत आढळून आली. दोन्ही बैल सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. गायीवर वाघाने हल्ला केल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगितले जात आहे.
या घटनेमुळे चिचोली आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात आणि गोठ्यात रात्री जाण्यास नागरिक घाबरत असल्याचे चित्र आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
संबंधित यंत्रणेकडून पुढील कार्यवाही सुरू असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








