spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विविध स्पर्धांनी रंगला ‘महापौर श्रावण उत्सव’

– कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे महिलांना त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वतःसाठी आनंदाने जगता यावेत, मैत्रिणींसोबत हसता-खेळता यावे आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने ‘महापौर श्रावण उत्सव सोहळ्या’चे आयोजन राजीव गांधी उद्यान, त्रिमूर्ती नगर येथे आज (ता. २६) उत्साहात करण्यात आले. महापौर निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्यास महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, जलप्रदाय विभाग सभापती दिव्य धुरडे, लक्ष्मीनगर झोन सभापती लक्ष्मी यादव, विधी समिती सभापती निधी तेलगोटे, धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, नगरसेविका वर्षा चौधरी,  माया हाडे यांच्यासह मनपाचे अधिकारी, माजी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे, वर्षा ठाकरे, विशाखा बांते, पल्लवी श्यामकुळे, विनिता दांडेकर, क्रीडा विभागाच्या उज्ज्वला चरडे मनपा कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी सांगितले की, श्रावण महिन्यापासून विविध सण-उत्सवांना सुरुवात होते. त्यामुळे महिलांसाठी काहीतरी वेगळे आणि आनंददायी आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना नवी ऊर्जा, नवीन व्यासपीठ आणि आनंद मिळावा, हाच या आयोजनामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध स्पर्धांनी रंगली श्रावणाची रंगत

कार्यक्रमात ‘श्रावण क्वीन’, ‘फुल राणी’, ‘तुझी माझी जोडी’ आणि ‘रंग माझा हिरवा’ अशा विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच श्रावण गीते, नृत्य, विविध खेळ, फॅशन शो आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. यावेळी  विना धोटे, दमयंती गोल्हर, गीतांजली बनकर, भारती शेंडे, मानसी बिसेन यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. सर्व विजेत्या महिलांना पैठणी साडी व डिनर सेट देऊन गौरविण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमय लोखंडे यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.