पुणे ११ : शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी जुन्या वैमनस्यातून आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरसह ८ आरोपींवर ‘मकोका’ (Maharashtra Control of Organised Crime Act) अंतर्गत कारवाई केली आहे, ज्यामुळे आंदेकर टोळीचे धागेदोरे कापले जाण्याची शक्यता आहे.
आयुष कोमकर हा गेल्या वर्षी झालेल्या वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता. त्यामुळे वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आंदेकर टोळीने आयुषची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्येप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता मकोका अंतर्गत कारवाई झाल्याने या प्रकरणातील आरोपींची चिंता वाढली आहे.
पुणे पोलिसांनी आयुष कोमकरची हत्या करणाऱ्या आंदेकर टोळीवर मकोका कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्तांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मकोकाअंतर्गत कारवाई केल्याने आरोपींना जामीन मिळणे कठीण होते आणि तपास यंत्रणांना अधिक अधिकार मिळतात. या कठोर कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




