spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मेडिकलमध्ये आता रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

– आशियातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाचा कॉर्पोरेट लूक

नागपूर :- मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेले नागपुरातील मेडिकलला कॉर्पोरेट लूक येत असून, आता रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही येथे निवारा केंद्र उभारली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने येत्या काही दिवसांत या रुग्णालयाचा चेहरा मोहरा तर बदलेला दिसणार आहेच, पण रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा हे या रुग्णालयाचे वैशिष्ट्य ठरू लागले आहे.

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेडिकल हा नागपूर किंवा विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील सर्वसामान्य रुग्णांचा सर्वात मोठा आधार आहे. त्यामुळेच शेजारच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील रुग्णही येथे उपचारासाठी येत असतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या रुग्णालयात गरिबांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आणि आता मेडिकल कात टाकत आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया, अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, बहु मजली पार्किंग प्लाझा, रुग्णांच्या आप्तांचीही काळजी या सुविधा मेडिकलची वैशिष्ट्ये ठरल्या आहेत.

मेडिकल मध्ये दररोज हजारो रुग्ण येत असले तरी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कोणतीच सोय नव्हती. त्यामुळे हे आप्त या परिसरातच दिवस अन रात्र काढायचे. मुख्यमंत्र्यांनी नेमके हे हेरले आणि आता या परिसरात तब्बल 11 निवारा केंद्रे पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. या केंद्रात पंखे, गरम पाणी, प्रसाधन गृह, खुर्च्या अशा आवश्यक सुविधा असणार आहेत. प्रत्येक केंद्राची क्षमता 200 असल्याने एकाचवेळी किमान 2200 लोक येथे राहू शकतील.

रोबोटिक सर्जरी

मेडिकलमध्ये गेल्या दीड वर्षांपासून रोबोटिक सर्जरी सुरू असून, आतापर्यंत तीनशेहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. दर आठवड्याला चार ते पाच निःशुल्क शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. रोबोटिक प्रणालीद्वारे गायनिक, युरोलॉजी आणि हृदयविषयक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. काही महिन्यापूर्वी येथे रोबोट द्वारे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आणि लवकरच हृदय तसेच यकृत प्रत्यारोपण सुरू होणार आहे.

रोबोटिक तंत्रज्ञानामुळे वेळ वाचतो, मानवी चुका कमी होतात आणि रुग्ण लवकर बरे होतात. दीड वर्षात इतक्या मोठ्या संख्येत रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे हे देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.

याशिवाय, कान-नाक-घसा विभागात CO₂ लेझर प्रणाली बसवण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी होतो आणि जखमा लवकर भरतात.

स्काय वॉक

कॅज्युअल्टी ते ट्रॉमा सेंटरपर्यंत स्कायवॉक तयार करण्यात आला असून, पावसात किंवा उन्हात रुग्णांना बाहेरून नेण्याची अडचण आता संपली आहे. आजवर गंभीर रूग्णांना ट्रॉमा केअर सेंटर मध्ये ऊन पावसात न्यावे लागायचे, मात्र आता या दोन इमारतींच्या मध्ये छत असलेला स्काय वॉक सुरू झाला आहे.

पेईंग वॉर्ड

मेडिकलमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा असल्या तरी बरेचदा मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय रुग्ण येत नाहीत. त्यामुळेच आता पेईंग वॉर्ड ची संख्या वाढविण्यात येत आहे. अशा 80 खोल्या आता येथे उपलब्ध आहेत. यापैकी काही वातानुकूलित खोल्या आहेत.

पार्किंग प्लाझा

परिसरात पार्किंग प्लाझासाठी तीन संकुले उभारली जात आहेत. यातील एक पाच मजली आणि दुसरे चार मजली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांचा अडथळा असणार नाही.

महाविद्यालय परिसरात 435 खोल्यांचे मुलींसाठी वसतिगृह, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, तसेच हृदय आणि यकृत प्रत्यारोपण केंद्र उभारणीच्या अंतिम टप्प्यात आहे.

क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वाकडे असून, यात जिम, हाय मस्त लाइट, बॅडमिंटन हॉल आणि जलतरण तलावाचे नूतनीकरण समाविष्ट आहे. तसेच नर्सिंग कॉलेजच्या नव्या इमारतीचे काम सुरू आहे.

रुग्णालयाच्या कॅन्सर हॉस्पिटलचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून, ते खासगी रुग्णालयांपेक्षा अधिक सुविधा देणार आहे.

परिसरात सिमेंट रस्ते आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून, सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर मेडिकलला कॉर्पोरेट लुक मिळणार आहे.

सर्वसामान्य माणसाचा विचार

समाजातील सर्वसामान्य माणसालाही उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकलला भरघोस निधी उपलब्ध करुन दिला त्यामुळेच आज चित्र बदलत असल्याची भावना मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.