जागतिक स्तन कर्करोग जनजागृती दिनानिमित्त मनपा अन् नागपूर नॉर्थ रोटरी क्लबतर्फे मेगा जनजागृती अभियान

0
56

नागपुर :- प्रत्येक वर्षी १६ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक स्तन कर्करोग जनजागृती दिनानिमित्त, रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरात मेगा जनजागृती अभियान सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आयुक्तांनी या अभियानाला सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

ही विशेष मोहीम मनपाच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने आयोजित करण्यात आली असून, महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणे, तसेच लवकर निदान आणि नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या शहरव्यापी मोहिमेअंतर्गत मनपातर्फे स्तन कर्करोगाविषयी माहितीपर संदेश प्रदर्शित केले जातील. तसेच, नागपूरमधील अनेक प्रसिद्ध स्मारके गुलाबी रंगात (Pink)उजळवली जाणार आहेत, ज्यामुळे या मोहिमेचे प्रतीकात्मक दर्शन होईल.या उपक्रमाद्वारे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, महिलांना स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहण्याची प्रेरणा देणे हा मोहिमेचा हेतू आहे.

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थचे अध्यक्ष रोटेरियन विनय दारा यांनी सांगितले,जनजागृती ही प्रतिबंधाची पहिली पायरी आहे. या मोहिमेद्वारे आम्हाला नागपूरमधील प्रत्येक महिलेला हे सांगायचे आहे की, स्तन कर्करोगाचे लवकर निदान आयुष्य वाचवू शकते. रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थ समाजाभिमुख उपक्रमांद्वारे खरा बदल घडवण्यास कटिबद्ध आहे.” नागपूरकरांना आवाहन करण्यात आले आहे की, येत्या १६ ऑक्टोबर रोजी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत,जनजागृती संदेश शेअर करावेत, आणि आपली घरे व कार्यस्थळे गुलाबी रंगात उजळवावीत, जेणेकरून या उदात्त कार्याला एकात्मता आणि पाठिंबा व्यक्त करता येईल.