नागपूर :- अपलोना गोंडवाना बहुउद्देशीय विकास संस्था, नागपूर च्यावतीने शनिवार, दि. 20 जून रोजी दुपारी 12.30 वाजता. रामटेक तालुक्यातील पवनी येथील ‘अपलोना गोटूल’ येथे ‘प्रतिमा गौरव व भविष्यवेध मार्गदर्शन महोत्सव 2026’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवलापार–पवनी या आदिवासी बहुल क्षेत्रातील शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्या बरोबरच त्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, विविध करिअर संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक संधींची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपलोना गोंडवाना बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राजे वासुदेवशहा टेकाम राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार माया इवनाते, महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ.टी.एस.भाल (IPS), संस्थेचे सचिव चंदनसिंग उईके, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके, सेवानिवृत्त प्राध्यापिका प्रा. सुमित्रा टेकाम तसेच मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालय, नागपूरचे प्राध्यापक डॉ. केशव वाळके उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच समाजातील पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक दिशा मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी व आयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत असून परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अपलोना गोंडवाना बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे.




