spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना

– लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 नागपूर :- राज्यातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सूक्ष्म सिंचन योजजना सुरू केली असून, संबंधित शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) ही केंद्र शासन पुरस्कृत महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी राबविली जाते. वाढते हवामान बदल, पाण्याची कमतरता, आणि उत्पादन खर्च लक्षात घेऊन ठिबक व तुषार सिंचन प्रणालीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची ३० ते ५० टक्के बचत होऊ शकते. तसेच पिकांना योग्य वेळी पाणी मिळते, उत्पादन वाढते, खत व मजुरी खर्चात बचत होते. फळबाग, भाजीपाला, ऊस, कापूस, हळद, सोयाबीन यासारख्या पिकांसाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त आहे.

या योजने अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्राकडून ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजजनेतील पूरक अनुदान मिळून एकूण अनुदान व अल्प तसेच अत्यल्प भूधारकाला ८० टक्के व इतर लाभार्थ्यांना ७५ टक्के पर्यंत मिळते. विशेषतः अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना किंवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अतिरिक्त अनुदान मिळून एकू ९० टक्के पर्यंत लाभ मिळतो. पात्र शेतकऱ्यांनी या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा यासाठी कृषी विभागामार्फत विशेष जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.

या संधीचा लाभ घेऊन पाण्याची बचत, उत्पादन वाढ आणि शाश्वत शेती विकासासाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालकांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यसाठी पात्र अनुसुचित जाती / अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी महाविस्तार एआय ॲपचादेखील वापर करता येईल. अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन व कागदपत्र पूर्ततेसाठी आपल्या गावातील सहायक कृषी अधिकाऱ्याची मदत घेता येईल. याबाबत अधिक माहिती संबंधित सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात मिळू शकेल, असेही कळविण्यात आले आहे.

Popular Articles