– आदिलाबाद दौऱ्यादरम्यान पाटणबोरी येथे थांबून आदिवासी बांधवांशी थेट संवाद; प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
पांढरकवडा :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी (दि. २८ जून) आपल्या नियोजित आदिलाबाद दौऱ्यादरम्यान पांढरकवडा जवळील पाटणबोरी येथे अचानक थांबून स्थानिक आदिवासी समाज बांधवांशी थेट संवाद साधला. समाजाच्या विविध समस्या शांतपणे ऐकून घेत, “समस्या तुमची, जबाबदारी माझी” असा विश्वास देत त्यांनी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
मंत्री महोदयांचा ताफा पाटणबोरी येथे पोहोचताच स्थानिक आदिवासी संघटना, नागरिक आणि युवकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शासकीय औपचारिकता बाजूला ठेवत त्यांनी थेट नागरिकांमध्ये बसून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी परिसरातील आदिवासी पाड्यांवरील रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच इतर मूलभूत प्रश्न नागरिकांनी मंत्री महोदयांसमोर मांडले.
प्रत्येक समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांमार्फत तातडीने पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन नामदार अशोक उईके यांनी दिले. त्यांच्या साधेपणा, संवेदनशीलता आणि जनसामान्यांशी थेट संवाद साधण्याच्या शैलीमुळे उपस्थित आदिवासी बांधव प्रभावित झाले.
यावेळी पाटणबोरी येथील आदिवासी समाज संघटनेच्या वतीने मंत्री महोदयांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. समाजाच्या हक्कासाठी सातत्याने काम करणाऱ्या नेतृत्वाचा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी माजी सभापती गजानन बेजंकीवार, सामाजिक कार्यकर्ते बंडू सोयाम, अंकित नैताम, शाम अरके, आदिवासी समाज संघटना पाटणबोरीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पाटणबोरी व परिसरातील शेकडो आदिवासी समाज बांधव, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री महोदयांच्या या अनपेक्षित भेटीमुळे पाटणबोरी परिसरातील आदिवासी समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
“समस्या तुमची, जबाबदारी माझी” – अशोक उईके
पाटणबोरी येथे नागरिकांशी संवाद साधताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी प्रत्येक समस्या गांभीर्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून कोणत्याही नागरिकाला अडचणीत एकटे सोडले जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या आश्वासनामुळे उपस्थित नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या.




