– सिल्लारीत आढावा बैठक, कडक उपाययोजनांचे दिले निर्देश
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- मानव-वन्यजीव संघर्षावर प्रभावी उपाययोजना आखण्यासाठी (दि.१२) एप्रिल रोजी सिल्लारी येथे राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी आढावा बैठक घेऊन उपस्थितांना कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पेंच व परिसरात वाढत्या वाघांच्या हालचाली आणि हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन तातडीने कडक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः संवेदनशील भागांमध्ये संरक्षक कुंपण उभारणे, आवश्यक त्या ठिकाणी ‘ग्रीन झोन’ विकसित करणे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत निर्देश मंत्री जयस्वाल यांनी दिले. तसेच या विषयावर मुख्यमंत्र्यासोबत लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करून ठोस मार्ग काढण्यात येणार असल्याचेही सांगितले. वन विभागाशी संबंधित एफडीसीएम सोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत कोणतीही नवीन वृक्षतोड अथवा वृक्षलागवड न करण्याबाबतही स्पष्ट निर्देश राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या कडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी बैठकीला राज्यसभा सदस्य खासदार माया इवनाते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) हर्ष पोतदार, वनबल प्रमुख एम. श्रीनिवासराव, मुख्य वन्यजीव रक्षक एम. श्रीनिवास रेड्डी, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एस. रमेश कुमार, नागपूर वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, उप वनसरंक्षक विनिता व्यास यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.