spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उच्च शिक्षणाच्या समतोल विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ठाम भूमिका

– खासगी विद्यापीठांचे केंद्रीकरण थांबवा; विदर्भ- मराठवाड्यातही जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था उभारा

– आ.मुनगंटीवार यांची गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्राच्या संदर्भातील आश्वासनाची तातडीने पूर्तता करा; शिक्षण क्षेत्रातील प्रादेशिक विषमता दूर करण्याची मागणी

मुंबई :- राज्यातील उच्च शिक्षणाच्या संधी काही मोजक्या शहरांपुरत्याच मर्यादित न राहता विदर्भ, मराठवाडा आणि इतर मागास भागांतील विद्यार्थ्यांनाही समान गुणवत्तेचे शिक्षण त्यांच्या परिसरात उपलब्ध झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडली. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान त्यांनी खासगी विद्यापीठांच्या असमतोल विस्ताराचा मुद्दा उपस्थित करत उच्च शिक्षणाच्या समतोल विकासासाठी ठोस धोरण राबविण्याची, तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्राबाबत दिलेले शासकीय आश्वासन तातडीने पूर्ण करण्याची जोरदार मागणी केली.

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे अधोरेखित करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” या प्रेरणादायी विचाराचा उल्लेख केला. तसेच संत गाडगेबाबा यांच्या “शिक्षणासाठी खर्च कमी पडू देऊ नका” या संदेशाची आठवण करून देत शिक्षणाकडे केवळ धोरणात्मक विषय म्हणून नव्हे, तर सामाजिक न्याय, समान संधी आणि सर्वांगीण विकासाचे प्रभावी साधन म्हणून पाहण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

आ. मुनगंटीवार म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात अनेक खासगी विद्यापीठांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र या विद्यापीठांचे भौगोलिक वितरण पाहिले असता बहुतांश संस्था पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातच केंद्रित असल्याचे दिसते. परिणामी विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे.

यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी संदीप युनिव्हर्सिटी, सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तसेच डी. वाय. पाटील अशी दर्जेदार शिक्षणसंस्था विदर्भ आणि मराठवाड्यात का उभ्या राहत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला.

Popular Articles