spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

यवतमाळमध्ये ७ जुलै रोजी ‘मोगरा फुलला’ संगीतमय कार्यक्रम

– संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मवर्षानिमित्त सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन

यवतमाळ :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ॲड. आशीष शेलार यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत ‘मोगरा फुलला’ या संत साहित्यावर आधारित संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे करण्यात आले आहे.

सामाजिक स्वास्थ्य, नैतिक मूल्ये आणि मानवतेची जपणूक करण्यासाठी संत साहित्याची आजही तितकीच आवश्यकता आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांसह महाराष्ट्रातील संतांनी आपल्या अभंग, ओव्या आणि विचारांमधून समाजाला समता, बंधुता, करुणा आणि अध्यात्माचा संदेश दिला. हा अमूल्य विचारवारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि नव्या पिढीला संतांच्या जीवनकार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने राज्यभर ‘मोगरा फुलला’ कार्यक्रम सादर केला जात आहे.

या कार्यक्रमात निरूपणकार गणेश शिंदे हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सामाजिक आशय आणि संत साहित्याचे महत्त्व प्रभावी निरूपणातून उलगडून सांगणार आहेत. त्यांच्या निरूपणाला गायक व वादकांची सुरेल संगीतसाथ लाभणार असून, अभंग, भारूड आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून रसिकांना भक्तिरसाचा अनोखा अनुभव मिळणार आहे.

सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, युवक तसेच वारकरी संप्रदायातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत विचारांचा जागर अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Popular Articles