– नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीच्या बैठकीत घेतला आढावा
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या माता व बालकांचे लसीकरण व उपाययोजनांच्या अनुषंगाने सोमवारी (ता. १७) टास्क फोर्सची बैठक मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्तांच्या सभा कक्षामध्ये पार पडली.
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. यावेळी ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाही, त्याकरिता विशेष प्रयत्न करून ते वेळीस पूर्ण करावे, असे निर्देश वसुमना पंत यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत प्रजानन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. गजानन पवाने, डॉ. अतीक खान, सीपीएम डॉ. अश्विनी निकम, पीएचएन अर्चना खाडे, उपशिक्षणाधिकारी संजय दिघोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) डॉ. शिल्पा नेल्लीक्कल यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत शहरातील गोवर आणि रुबेला हे साथरोग निर्मुलनाच्या पायरीवर आहेत, आपल्या सतत प्रयत्नांमुळे हे साथरोग समूळ नष्ट होतील असे जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी यावेळी सांगितले. बैठकीत सर्वप्रथम डॉ. सरला लाड यांनी बैठकीच्या मुद्द्यांची माहिती दिली. त्यानंतर डॉ. साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेत माहिती दिली. त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली. नवजात बालकांपासून ते गरोदर मातांना विविध प्रकारचे लसीकरण केले जात असून, या लसींपासून कुणीही माता आणि बालक वंचित राहू नये यावर भर देण्यात आला.
अधिकाधिक ठिकाणी जाऊन वंचित बालकांचे लसीकरण करण्याची गती वाढविण्यात यावी, नियमित लसीकरण संदर्भात ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावी, झोननिहाय खासगी डॉक्टरांची बैठक घेण्यात यावी आदी निर्देश ही अतिरिक्त आयुक्तांनी यावेळी दिले. संपूर्ण शहरात नवजात बालकांचे पहिल्या दिवसांपासून इतर सर्व नियमित लसीकरण हे वेळेवर योग्यरित्या आणि शंभर टक्के व्हावे, यादृष्टीने झोनस्तरावर नियोजन आणि कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त पंत यांनी झोन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.




