spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खासदार पडोळेंच्या लढ्याला यश; शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा

– भंडारा जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना १९४ कोटींचा लाभ

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि संघर्षामुळे अखेर धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धान खरेदीपोटी थकीत चुकारा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यात शेतकरी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.

खरीप हंगाम 2025–26 अंतर्गत धान खरेदीचे पैसे खात्यात न आल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत होते. या प्रश्नावर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी लोकसभेत सातत्याने आवाज उठवला. लोकसभेत बोलण्याची संधी नाकारल्यानंतर त्यांनी संसद भवनाबाहेर पायऱ्यांवर बसून आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी निलंबनाचीही पर्वा न करता त्यांनी आपला लढा सुरू ठेवला.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, भंडारा यांच्या 7 फेब्रुवारी 2026 रोजीच्या अहवालानुसार, आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 194 कोटी 1 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. एकूण 31 लाख 51 हजार 897 क्विंटल धान खरेदी झाली होती. त्यापोटी एकूण 746 कोटी 68 लाख रुपये चुकारा प्रलंबित होता. यापैकी मोठा हिस्सा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

या खरेदी प्रक्रियेत शेतकरी लाभार्थी संख्या 87 हजार 954 आहे. यापैकी आतापर्यंत 68 हजार 614 शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित रक्कमही लवकरच अदा केली जाईल, अशी माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रक्कम खात्यात चुकारा जमा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. डॉ. प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांकरिता लढा दिला, त्यामुळे चुकारा जमा होऊ शकला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संसदेत आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करून न्याय मिळवून दिल्याबद्दल जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे धन्यवाद केले आहे.

Popular Articles