पुसद २४ – पुसद तालुक्यातील रामरहीम नगर, श्रीरामपूर येथील केवळ ९ वर्षांचा उमर खान हुसेन खान या चिमुकल्याला Blood Cancer (रक्ताचा कर्करोग) झाल्याचे निदान झाले. त्याचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने उपचार आवश्यक होते. त्यामुळे उमरला भगवान महावीर जैन हॉस्पिटल, बेंगळुरू येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारांसाठी सुमारे १४ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले आणि उमरच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले.
वडील हुसेन खान यांनी आपल्या मुलाच्या जीवासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अनेक दरवाजे ठोठावले, मदतीसाठी धावपळ केली. मात्र एवढी मोठी रक्कम उभी करणं त्यांच्यासाठी अत्यंत अवघड ठरत होते. संपूर्ण कुटुंब चिंतेत असताना अॅड. नसरुल्ला खान यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने त्यांनी खासदार संजयभाऊ देशमुख यांची भेट घेतली व मदतीची विनंती केली.
खासदार संजयभाऊ देशमुख यांनी संकटग्रस्त कुटुंबाच्या वेदना ओळखताच तात्काळ हालचाल सुरू केली. वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करून कार्यरत असलेल्या आरोग्य विभागाचे जबाबदार स्वीय सहाय्यक गजानन कदम यांना पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
गजानन कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता उमरच्या उपचारांसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा केली. त्यांनी प्रस्ताव तातडीने सादर करत सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येत, खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या शिफारसी व मार्गदर्शनामुळे पंतप्रधान सहाय्यता निधीतून ३ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आला असून मंजुरी पत्र मिळताच घरच्या वडिलांनी कृतज्ञतेने सांगितले की एक जीव वाचला… एक परिवार सावरला.
“खासदार संजयभाऊ देशमुख यांनी धावून येत वेळेवर मदतीचा हात दिला. गजानन कदम यांनी सगळी प्रक्रिया स्पष्टपणे समजावली आणि पाठपुरावा केला. आमचा मुलगा वाचू शकतो, ही आशा मिळाली. आम्ही संपूर्ण कुटुंबाने त्यांचे आभार मानतो.”
संकटात सापडलेल्या सामान्य जनतेला त्वरित मदतीचा हात देणं, ही लोकप्रतिनिधींची खरी ओळख असते. खासदार संजयभाऊ देशमुख आणि त्यांचे कार्यसंघ संकटात मार्गदर्शक शिक्षकासारखे ठरले. गजानन कदम यांनी समर्पणभावाने केलेले काम खरोखरच अनुकरणीय आहे.
उमर खानसारख्या गरजू रुग्णांना वेळेवर मिळणारी मदत ही केवळ आर्थिक मदत नसून, त्यांच्या कुटुंबाला जगण्याची नवी आशा देणारी असते. अशा संवेदनशील आणि तत्पर प्रतिनिधीमुळे लोकशाही अधिक बळकट होते, हे निश्चित!




