१ मे २०२६ च्या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील उद्घाटनानंतर मुंबई पुणे द्रुतगती अर्थात यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरून जाण्याचा योग आला व या मार्गाच्या परिवर्तनावर एक छोटेसे चिंतन…..
सन २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील पायाभूत सोयी सुविधा समितीने मंजुरी दिलेले हे प्रकल्प सन २०२५ ते २०२६ मध्ये पूर्ण झाले आहेत यात समृद्धी महामार्गाचा सुद्धा समावेश होतो. यात महाराष्ट्र शासनाची तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाची प्रकल्प पूर्णत्वाची गतिमानता अधोरेखित होते.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग हा खोपोलीच्या घाटात वाहनांच्या कोंडीत सापडायचा व पुणे मुंबई प्रवास हा ७ ते ८ तासांचा ठरायचा. त्यानंतर मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने हा प्रवास ४ ते ५ तासांवर नेऊन ठेवला त्यात घाटातील वळणे सुधारित केली गेली व रस्त्याची रुंदी सुद्धा वाढवली. या मार्गावर घाटात आडोशी व खंडाळा हे दोन टनेल आहेत त्यापैकी आडोशी हा वन वे टनेल तर खंडाळा हा टू वे टनेल आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन व्हायचे व प्रवाशांना पावसाळ्यात गाडी चालवताना जीव मुठीत धरावा लागत असे.
मुंबईकडून पुण्याला जाताना खालापूरच्या फूडमॉलपासून पासून कुसगावपर्यंतचा हा भाग लोणावळा व खंडाळा दरम्यानचा अवघड असा घाट भाग होता. या भागात मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचे देखभाल व दुरुस्ती केंद्र त्यापुढे वळवण कनेक्टर तसेच लोणावळा व खंडाळा एक्झिट, खंडाळा टनेल तदनंतर अमृतांजन ब्रिज ज्यामुळे कोकण व पुणे भाग विभागला जात होता नंतर दस्तुरी पॉईंट व वनविभागाचे विश्रामगृह, मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची व राष्ट्रीय महामार्गाची सामायिक लांबी, वाय पॉईंट, अडोशी टनेल तसेच खोपोली एक्झिट असे पॉईंटस आहेत. हा भाग पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने नटलेला असायचा व गाडीतून जाताना छोटे छोटे धबधबे तसेच हिरवेगार डोंगर मन मोहून टाकायचे.
याच भागात गाड्या बंद पडायच्या व त्या दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिक हे टू व्हीलरवरून हिंडायचे. बऱ्याच प्रवाशांना प्रश्न पडायचा की द्रुतगती मार्गातून यावर दुचाकी वाहने कशी काय दिसत आहेत? परंतु याच भागात मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचा सामायिक भाग असल्याने हे दृश्य दिसणे स्वाभाविक होते. परंतु बऱ्याच प्रवाशांना याची कल्पना नाही.राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग हे सामायिक असल्याने राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी वाहनांना प्रवास करता येतो.
नवीन मिसिंग लिंक प्रकल्पात जुन्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची जी अलाइनमेंट होती तीच अलाइनमेंट वापरून हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. या प्रकल्पात एक महाकाय टनेल व केबल स्टेड ब्रिजचा समावेश आहे. यामुळे घाटातील अलाइनमेंटला एक सरळता व सुलभता आलेली आहे. टनेल ची लाइटिंग अतिशय उत्तम असून टनेलच्या रुंदीची नोंद ही गिनीज बुकात घ्यावी लागली आहे. सर्वसाधारणपणे 23 मीटर रुंद व दहा मीटर उंच असा हा टनेल किंवा बोगदा आहे.या प्रकल्पामुळे आपणास वेळेची बचत साध्य झालेली आहे व मुंबई ते पुणे हा प्रवास २ ते ३ तासात करणे सहज शक्य झाले आहे.
मालवाहतुकीची वाहने ही मूळ द्रुतगती मार्गावरून तसेच मिसिंग लिंकने प्रवाशांची वाहने पाठवून सुरक्षिततासुद्धा या प्रकल्पाने साध्य केलीआहे.
या प्रकल्पामुळे आता कुसगाव ते खालापूर फूड मॉल मधील वर नमूद केलेले वेगवेगळे पॉईंट्स आपणास दिसणार नाहीत. खंडाळा टनेल व आडोशी टनेल शोधूनसुद्धा सापडणार नाहीत. घाटातील धबधबे आता पावसाळ्यात खुणावणार नाहीत. दस्तुरी पॉईंटला बंद पडलेल्या गाड्या व दुरुस्तीला येणारे मेकॅनिक सुद्धा दिसणार नाहीत. टायगर व्हॅली दिसणार नाही तसेच तेथील सुंदर धबधबा व बॉलीवूडमधील गाण्यांचा शूटिंगचा टेबल टॉपही दिसणार नाही. दस्तुरी व अमृतांजन ब्रिज तसेच खंडाळा टनेलच्या जवळपास होणारी वाहतुकीची कोंडीसुद्धा आता दिसेनाशी होईल. दूरवर डोंगरात दिसणारी रेल्वेची लाईन व खेळण्यासारखी दिसणारी रेल्वे व घाटाखाली नजरेने दिसणारे खोपोली आता गडप झाल्यात जमा आहे.
परिवर्तन संसार का नियम है आणि हेच “परिवर्तन” तसेच रस्त्यावरील वाहतुकीची सुलभता ,सरळता व सुरक्षितता या मिसिंग लिंकमुळे अधोरेखित झालेली आहे. भूतकाळातील काही पॉईंट्स तसेच रस्त्यावरून दिसणारे लोणावळा व खंडाळा तसेच सह्याद्रीचे डोंगर व जलप्रपात आता दिसणार नाहीत.. म्हणतात ना “कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना भी पडता है”
मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा प्रकल्प हा सुरुवातीला १६०० कोटी रुपयांचा होता व तो वाढून २१०० कोटी रुपयांचा झाला असे वाचण्यात आले होते. आता मिसिंग क्लीन चा प्रकल्पही १६०० कोटी रुपयांचा आहे असे वाचण्यात आले.१६०० कोटी रुपयांचा हा योगायोग..असो….
अशा या द्रुतगतीमार्गाच्या मुसाफिरगिरी वर मला “अपनापन” या १९७७ च्या चित्रपटातील हे गाणे गुणगुणावेसे वाटले…
आदमी मुसाफिर है,आता है, जाता है
आते जाते रस्ते में,यादें छोड जाता है
झोंका हवा का, पानी का रेला
मेले में रह जाये जो अकेला
फिर वो अकेला ही रह जाता है
क्या साथ लाये, क्या तोड़ आये
रस्ते में हम क्या-क्या छोड़ आये
मंजिल पे जा के याद आता है
आदमी मुसाफिर है,आता है, जाता है
आते जाते रस्ते में, यादें छोड जाता है…..
असा हा मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा मिसिंग लिंकवरचा प्रवास तुम्हाला नक्कीच जुन्या काळात घेऊन जाईल. आणि रस्त्यावरील आठवणी ताज्या करेल.
माझा हा लेख मुंबई ते पुणे हा प्रवास द्रुतगती मार्गावरून करणाऱ्या प्रवाशांना तसेच सर्वसाधारण प्रवाशांनाही आणि रसिकांना नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि माझे” शब्दांची झाली फुले ” हे फेसबुक पेज तसेच यूट्यूब चैनल आपण सबस्क्राईब कराल अशी आशा व्यक्त करतो…
– संतोष विजयकृष्ण कुलकर्णी, इंद्रधनु,सोलापूर……. इंजिनिअर