spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ताडोबामध्ये स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर अन्याय बंद करा – WE CARE FOUNDATION

चंद्रपूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने होमस्टे धारकांना विशेष स्वरूपात क्रूझर वाहन सुविधा उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून, त्याविरोधात WE CARE FOUNDATION, चंद्रपूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष हिमायूँ इसराईल अली यांनी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर प्रभुनाथ शुक्ला यांना औपचारिक निवेदन सादर केले आहे.

दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी येल्लू व इतर अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोहर्ली क्षेत्रासाठी एक आणि कोलारा क्षेत्रासाठी एक असे दोन क्रूझर वाहन होमस्टे धारकांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही व्यवस्था दिनांक 4 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आली आहे.

WE CARE FOUNDATION च्या मते, या निर्णयामुळे चंद्रपूरमधील स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच सामान्य पर्यटकांना जंगल सफारी बुकिंगसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींसाठी उपलब्ध असलेली सुविधा कमी करून खासगी होमस्टे धारकांना लाभ देणे हा जनविरोधी आणि अन्यायकारक निर्णय असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

संस्थेचे अध्यक्ष हिमायूँ इसराईल अली यांनी सांगितले की, वन विभागाला होमस्टे धारकांसाठी विशेष सुविधा द्यायची असल्यास त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी; मात्र स्थानिक नागरिकांच्या हक्कातील सुविधा कमी करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही.

WE CARE FOUNDATION ने वन विभागाकडे मागणी केली आहे की, होमस्टे धारकांना देण्यात आलेली क्रूझर वाहन सुविधा तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणेच स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींसाठी ती सुविधा पुन्हा सुरू करण्यात यावी.

संस्थेने इशारा दिला आहे की, या गंभीर विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास WE CARE FOUNDATION चंद्रपूरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींसोबत मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडेल, ज्याची संपूर्ण जबाबदारी वन विभाग प्रशासनाची राहील.

निवेदन सादर करताना WE CARE FOUNDATION चे उपाध्यक्ष सुयोग भोयर, सचिव प्रफुल्ल जेनेकर, कोषाध्यक्ष सागर दुर्गे तसेच सदस्य हाजी अली, मोहम्मद समीर आणि सचिन डाखरे उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.