spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाद्वारे माजी सैनिकांच्या निवासस्थानी ‘नामफलक’

– स्वातंत्र्यदिनी देशसेवकांचा सन्मान; आठ माजी सैनिकांच्या घरासमोर नामफलक

नागपूर :- देशरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि सीमांवर शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांच्या निवासस्थानासमोर सन्मानपूर्वक ‘नामफलक’ लावण्यात आले. स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांच्या संकल्पनेतून आणि महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

मनपाच्या वतीने प्रथमतः आठ माजी सैनिकांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या नावाचे विशेष नामफलक लावण्यात आले. या नामफलकावर संबंधित माजी सैनिकांचे नाव, हुद्दा/रँक तसेच त्यांनी सेवा बजावलेल्या सैन्यदलाची माहिती मराठी व इंग्रजी भाषेत नमूद करण्यात आली आहे. महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, नगरसेवक विनय दाणी, योगेश पाचपोर यांच्या हस्ते विविध ठिकाणी नामफलकांचे अनावरण करण्यात आले.

यामध्ये माजी स्वातंत्र्यसैनिक सुधाकर नामदेवराव मोरे यांच्या निवासस्थानासमोरील नामफलकाचे अनावरण  महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या रक्षणाचे काम करणारे सेना अधिकारी यांच्या घरापुढे नाम फलक लावण्याचा निर्णय मनपातर्फे घेण्यात आला आहे. अशी तरतूद स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी मनपाच्या अर्थ संकल्पात देखील केली आहे.

निवृत्त कमांडर गुरुबचन सिंह कंवल यांच्या निवासस्थानासमोरील नामफलकाचे अनावरण स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय सेनेचे शहीद नायक सुनील काशिराम नखाते तसेच वीरनारी कल्पना सुनील नखाते यांच्या निवासस्थानासमोरील नामफलकाचे अनावरण सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी माजी सैनिकांच्या त्यागाचा आणि देशभक्तीचा सन्मान करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात या उपक्रमासाठी विशेष आर्थिक तरतूद केली आहे. भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही सैन्यदलांमध्ये सेवा बजावलेल्या ज्येष्ठ माजी सैनिकांनी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत निष्ठेने कर्तव्य पार पाडले आहे. त्यांच्या कार्याची ओळख समाजातील प्रत्येक नागरिकाला व्हावी आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम व देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

माजी सैनिकांच्या घरासमोर लावण्यात आलेला हा नामफलक केवळ सन्मानाचे प्रतीक नसून, त्या परिसरात राष्ट्रसेवा केलेला एक माजी सैनिक वास्तव्यास असल्याची अभिमानाची जाणीव करून देणारा आहे. या उपक्रमामुळे माजी सैनिकांप्रती नागरिकांच्या मनात आदर, सन्मान आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. नामफलक लावण्यात आल्याने माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही आनंद आणि अभिमानाचे भाव उमटले.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी क्रीडा सभापती श्रीमती दर्शनी धवड यांचेही सहकार्य लाभले. तसेच क्रीडा अधिकारी पीयूष अंबुलकर यांनी सक्रिय सहभाग व समन्वय साधत उपक्रमाच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नागपूर महानगरपालिकेचा हा उपक्रम देशासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांना कृतज्ञ अभिवादन करणारा असून, त्यांच्या राष्ट्रसेवेची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.