spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत मनपा उभारणार २५६१ सदनिका

– मनपा आयुक्त डॉ.विपीन यांनी घेतला पीएमएवाय २.० प्रकल्पाचा आढावा

नागपूर :- प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने बांधकाम करण्यात येत असून, प्रकल्पाच्या प्रगतीचा मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी आढावा घेतला. विशेष म्हणजे, सदर योजनेंतर्गत मनपा शहरातील विविध ठिकाणी २ हजार ५६१ सदनिका उभारणार आहे.

आयुक्त सभा कक्षात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सुनील उईके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांना उत्तम सोयीसुविधांनीयुक्त घरे तयार करून देण्यासाठी मनपा कार्यरत असून, नागरिकांनी सदनिकेसाठी मोठ्या संख्येत आवेदन अर्ज करण्यासाठी त्यांना प्रकल्पाची माहिती देण्यात यावी अशा सूचना आयुक्त डॉ. विपीन यांनी दिल्या.

पीएम आवास योजना २.० अंतर्गत मनपातर्फे उत्तर नागपूर क्षेत्रातील मौजा नारी येथे ५१८ सदनिकांचे (२१० सदनिका १-बीएचके व ३०८ सदनिका २-बीएचके) बांधकाम केले जाणार असून, यासाठी नागरिकांकडून ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय, केंद्र शासनाने मौजा पुनापूर येथे ८४० सदनिका (१-बीएचके) आणि मौजा हुडकेश्वर येथे २४० सदनिका (१-बीएचके) तयार करण्याच्या प्रकल्पास मंजुरी प्रदान केली आहे. तसेच मौजा जयताळा येथे ५७१ ईडब्ल्यूएस सदनिकांचा (१-बीएचके) प्रस्ताव शासन मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, अंमलबजावणीकरिता मे. आर्चीनोवा डिझाईन इंक यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मनपा सफाई कर्मचारी गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून मौजा नारी येथे ३९२ सदनिका (२-बीएचके) तयार करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली असून, मनपातर्फे हे बांधकाम केले जाणार आहे. या योजनेमुळे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे स्वप्नातील घर साकार होणार असून, प्रकल्प राबविताना पर्यावरण व रेन वॉटर हार्वेस्टिंगवर विशेष लक्ष दिले जात आहे.

मौजा नारी येथे ५१८ सदनिकांसाठी अर्ज सुरू

पीएम आवास योजना (शहरी) 2.0 मधील मौजा नारी येथे तयार करण्यात येत असलेल्या भागीदारी तत्वावर परवडणारी घरे (एएचपी) 518 सदनिकांच्या प्रकल्प अहवालास केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीची मान्यता प्रदान करण्यात आली असून, १ बीएचकेच्या सदनिकांची संख्या 210 तर 2बीएचके सदनिकांची संख्या 308 राहणार आहे. यात अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग व दिव्यांगासाठी राखीव सदनिका राहणार आहेत. सदनिकांचे बांधीव (बिल्टअप एरीया) क्षेत्रफळ ४७८ व ६१९ चौरस फूट बांधकाम राहणार आहेत.

या योजनेअंतर्गत अर्जाची नोंदणी करताना लाभार्थीला 1बीएचकेच्या सदनिकांसाठी 3 हजार रुपये तर 2बीएचके सदनिकांच्या नोंदणीसाठी 5 हजार रुपयांचा ऑनलाईन भरणा करावा लागेल. ही रक्कम लाभार्थीला परत मिळणार नाही. या प्रकल्पात 1बीएचके सदनिकांच्या एकूण 4 इमारती राहणार असून 2बीएचकेच्या 11 इमारती राहणार आहेत. या प्रकल्पाचे विकासक म्हणून मे. संदीप डेव्हलपर्स प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1बीएचके सदनिकांची किंमत 15 लाख 51 हजार 672 रुपये एवढी राहणार आहे तर 2 बीएचके सदनिकांची किंमत 21 लाख 1 हजार 748 रुपये राहणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थीला अडीच लाख रुपयांचे शासकीय अनुदान मिळणार असल्याने अनुदान वजा जाता 1 बीएचके सदनिकेची किंमत 13 लाख 1 हजार 672 तर 2 बीएचके सदनिकेची किंमत 18 लाख 51 हजार 748 रुपये एवढीच राहणार आहे. याशिवाय स्टँप ड्युटी, नोंदणी शुल्क, अर्बन लोकल बॉडी टॅक्स, मेट्रो सेस, जीएसटी, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस, इलेक्ट्रीक मीटर, सोसायटी डिपॉझीट व लिगल चार्जेसची रक्कम अतिरिक्त जमा करावी लागणार आहे.

31 मार्चपर्यंत नोंदणी करता येईल

या प्रकल्पासाठी इच्छुकांना 31 मार्च 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. सदनिकांचे वाटप ऑनलाईन संगणकीय पद्धतीने होणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या https://www.nmcnagpur.gov.in/ या संकेत स्थळावर उपलब्ध राहील.

कोण राहील पात्र

1. अर्जदार नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.

2. अर्जदार तथा त्यांच्या कुटुंबाच्या नावे देशात कुठेही पक्के घर नसावे.

3. शासन निर्णयानुसार अर्जदार तथा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.

४. मागील २० वर्षात कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.