spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा प्रभावी वापर व्हावा – विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे

– विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

– ‘सांज शब्दांची’ काव्य मैफल आणि विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण  

नागपूर :- मराठी भाषेत सर्व वयातील वाचकांसाठी साहित्य उपलब्ध असून त्याचे वाचन व्हावे व या साहित्यातील जीवनमुल्ये आचरणात यावे आणि कार्यालयीन कामकाजात त्याचा प्रभावी वापर व्हावा, असे आवाहन विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी येथे केले.

मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील नियोजन भवनात ‘सांज शब्दांची’ या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी विचार मांडले. महसूल अपर आयुक्त राजेश खवले,सहायक आयुक्त भुसूधार तथा विभागीय मराठी भाषा अधिकारी शिल्पा सोनाले,निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे आदी उपस्थित होते.

डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा व त्याचे महत्व पटवून दिले. मराठीतील संवाद, लिखाण आणि साहित्यातून ही भाषा जीवंत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाषेबाबत कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून न राहता मानवी बुद्धीचा उपयोग होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संत आणि साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली या मराठीत मोठा भाषिक व्यवहार निरंतर झाला आहे. हा वारसा टिकवून ठेवत शासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर करताना घ्यायची काळजी त्यांनी विविध उदाहरणांद्वारे समजावून सांगितली व कार्यालयीन कामकाजात या भाषेचा प्रभावी वापरा व्हावा, असेही त्या म्हणाल्या.

महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी भाषेचा संज्ञात्मक विकास सोदाहरण स्पष्ट करून सांगितला. मराठी भाषेच्या धारणांमध्ये झालेला बदल,संत साहित्याने मराठीच्या विकासात दिलेल्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला. मराठी भाषेत नवसाहित्य निर्मिती व्हावी, मराठी बाबतचा न्यूनगंड सोडून या भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करतांना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठीसह अन्य भाषांना उज्ज्वल भविष्य असल्याचा विश्वासही त्यांनी मांडला.

सहायक आयुक्त तथा विभागीय मराठी भाषा अधिकारी शिल्पा सोनाले यांनी प्रास्ताविक केले.

‘सांज शब्दांची काव्य मैफलीत कवी व व्याख्याते प्रताप वाघमारे (वर्धा), सुप्रसिद्ध हास्य कवी नितीन वरणकार (शेगाव),हास्य कवी आणि गझलकार गोपाल मापारी (अकोला) आणि सुप्रसिद्ध हास्य-गेय कवी प्रा.संजय कावरे (मंगरुळपीर) यांनी आपल्या खास शैलीतील कविता सादर केल्या.

मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने १० फेब्रुवारी २०२६ रोजी निबंध लेखन, चारोळी लेखन/घोषवाक्य, शब्दकोडी आणि कविता वाचन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधे विविध शासकीय विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.

नागपूर विभागीय संचालक कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांना काव्य वाचन स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तर कार्यालयाच्या वरिष्ठ लिपीक कविता फाले यांना शब्द कोडी स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे तर कविता वाचन स्पर्धेत प्रोत्साहन पर पारीतोषिक प्रदान करण्यात आले. महसूल अपर आयुक्त राजेश खवले आणि विभागीय मराठी अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

असे आहेत पुरस्कार विजेते

निबंध स्पर्धेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ लिपीक यांना प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इशिता राजगुरे यांना द्वितीय क्रमांकाचे तर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या महसूल शाखेचे सहायक महसूल अधिकारी चेतन नागपुरे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला.

चारोळी लेखन व घोषवाक्य स्पर्धेते पहिल्या क्रमांकांचा पुरस्कार राज्य वस्तू व सेवाकर भवनातीन राज्यकर निरीक्षक कविता वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या कक्ष सेवक अंकिता गिरी यांना द्वितीय क्रमांकाचे तर याच महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थीनी योगिता पोले यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला.

शब्दकोडे स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सामान्य प्रशासन शाखेच्या सहायक महसूल अधिकारी सविता फाले यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच विभागाच्या सहायक महसूल अधिकारी मंदा शंभरकर आणि सहसंचालक लेखा व कोषागारे कार्यालयाच्या वरिष्ठ लेखापाल संध्या निमसडे यांना द्वितीय पुरस्कार विभागून प्रदान करण्यात आला.

कविता वाचन स्पर्धेत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक अमित नकाणेकर यांना प्रथम क्रमांकाचा तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.वैभव कारेमोरे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या चारही स्पर्धांच्या परिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. आसावरी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक कमलाकर गायकवाड यांनी आभार मानले.

Popular Articles