spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाच्या महिला उद्योजिका मेळाव्याचे थाटात उद्घाटन

– शहरातील महिला बचत गटांचा मोठ्या संख्येने सहभाग

नागपूर :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महिला सशक्तीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी करीत नागपूर महानगरपालिकेने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या महिला उद्योजिका मेळावा २०२६ चे शनिवार (ता. ३१) रेशिमबाग मैदानात दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी होते.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, नागपूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक बाबाराव तायडे, नगरसेविका ज्योती देवघरे, नगरसेविका मंगला म्हस्के, नगरसेविका मानसी सिमले, नगरसेविका वैशाली उदापूरकर, नगरसेविका सानवी शेंडे, नगरसेवक हरेश्वर रारोकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., पद्मश्री स्काय डायव्हर शीतल महाजन, प्रसिद्ध अभिनेत्री संचिता कुलकर्णी, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त  मिलिंद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, सहायक आयु्क्त नरेंद्र बावनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, उपअभियंता चमाटे, क्रीडा अधिकारी पियूष अंबुलकर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे महापालिकेच्या मानाचा दुपट्टा, तुळशींचे रोपटे व महिला बचत गटांच्या सदस्यांनी तयार केलेले उत्पादने देऊन स्वागत करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या सशक्तीकरणासाठी तसेच शहरातील महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मनपाच्या सामाजिक विकास विभागाच्यावतीने महिला उद्योजिक मेळावा आयोजित केला जात आहे. दरवर्षी या मेळाव्याला महिला उद्योजिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी सुद्धा या मेळाव्यात शहरातील २६४ इतक्या महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला आहे. यात खाद्यपदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, धान्य, मसाले, कपडे, दागिने, रेडीमेड कपडे आदींचे स्टॉल लागले आहे. हा मेळावा येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ५ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

या्प्रसंगी बोलताना आमदार मोहन मते म्हणाले, शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नागपूर महानगरपालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. या महिला मेळाव्यातून महिलांमधून चांगले उद्योजक निर्माण होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी सुद्धा स्वदेशी वापर करण्यावर भर द्यावा तसेच बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचा जास्तीतजास्त वापर करावा, असे आवाहन आमदार मोहन मते यांनी केले.

या मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी या मेळाव्यात सहभागी झालेल्या महिला बचतगटांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला. महिला बचत गटांना विक्रीसाठी व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रामुख्याने एक प्रयत्न आहे. दरवर्षी या मेळाव्याचे स्वरुप वाढत आहे. यावरून दरवर्षी होणाऱ्या या महिला उद्योजिका मेळावा यशस्वी होत असल्याची पावती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात नागरिकांना दर्जेदार उत्पादन मिळणार असून यातून महिला सक्षमीकरणास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्र्मानंतर आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आयु्क्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह सर्व मान्यवरांनी बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या व महिला उद्योजकांचे मनोबल उंचावले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

संगीत कार्यक्रमांची मेजवानी

उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर शिवानी जोशी म्युझिकल ग्रुपचा संगीताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हिंदी व मराठी गीतांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद मेळाव्याला भेट देणार्यांनी घेतला.

महिला उद्योजिका मेळाव्यात शहरातील २६४ महिला बचत गटांचे स्टॉल लागले आहेत. यात हस्तकला, खाद्यपदार्थ, रेडीमेड कपडे, दागिने, हर्बलच्या वस्तू, सेंद्रीय पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहे. हा मेळावा येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ५ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हा मेळाव्यात प्रवेश सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध आहे.

ढोलताशाचे सादरीकरण

शहरातील कलावंत ढोलताशा व ध्वज पथकाने सादरीकरण केले. यात ७० तरुण-तरुणींनी ढोलताशांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी चांगली दाद दिली. या पथकाचे नेतृ्त्व शुभम शेंडे यांनी केले.

आज जल्लोष बँड

रविवारी या मेळाव्यात जल्लोष बँडचा संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तसेच देशभक्तीपर व मराठी गीताचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

रेशिमबाग मैदानावर होत असलेल्या या मेळाव्यासोबत संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मेजबानी सुद्धा मेळाव्याला येणार्यांना मिळणार आहे. उद्या म्हणजे १ फेब्रुवारीला जल्लोष बँडचा संगीत कार्यक्रम तसेच देशभक्तीपर व लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. येत्या २ फेब्रुवारीला समुह नृत्य व विनोदी एकांकीका पाहायला मिळणार आहे. ३ फेब्रुवारीला लागली पैज हा मराठी नाटकाचा प्रयोग होणार आहे.

येत्या ४ फेब्रुवारीला आकर्षक फॅशन शो होणार आहे. यात महिला नगरसेविका व मनपा अधिकार्यांचा संदेशपर रॅम्प वॉक होणार आहे. तसेच याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांचे राणी मी होणार चे विशेष सादरीकरण होणार आहे.

येत्या ५ फेब्रुवारीला या मेळाव्याचा समारोप होणार आहे. यात विमला नेगी देऊस्कर यांचे प्रेरक व्याख्यान होणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.