पुणे १४ : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली राजकीय पार्श्वभूमी आणि तक्रारदार यांच्यातील संबंध लक्षात घेता, आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मानहानी प्रकरणी पुणे कोर्टात सुनावणीदरम्यान त्यांनी हा दावा केला. राहुल गांधी यांनी कोर्टात उपस्थित राहण्यासाठी मनाई करत आपली सुरक्षा आणि निष्पक्ष सुनावणीसाठी ‘प्रिव्हेंटिव्ह प्रोटेक्शन’ची मागणी केली आहे.
कोर्टात काय म्हणाले राहुल गांधी?
वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यात मानहानीचा खटला दाखल केला आहे. याच प्रकरणी कोर्टाने राहुल गांधी यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते.
बुधवारी (१४ ऑगस्ट २०२५) या प्रकरणी झालेल्या सुनावणीत राहुल गांधींच्या वतीने त्यांचे वकील मिलिंग पवार यांनी कोर्टात बाजू मांडली. पवार यांनी कोर्टात सांगितले की, तक्रारदार सत्यकी सावरकर यांचे संबंध गोडसे कुटुंबाशी आहेत आणि त्यांच्याकडून जीवाला धोका असल्याची भीती आहे.
यासोबतच, पवार यांनी भाजप नेते बिट्टू आणि तरविंदर मारवाह यांच्या धमक्यांचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना ‘जर त्यांची वागणूक योग्य नसेल तर त्यांचा शेवट त्यांच्या आजीसारखा (इंदिरा गांधी) होईल’, असे म्हटले होते. या सर्व गोष्टींमुळे राहुल गांधींच्या सुरक्षिततेची चिंता वाढली असून, त्यांनी कोर्टाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पुढील सुनावणीत यावर निर्णय अपेक्षित आहे.
@filephoto




