– ८ महिन्यांनी हत्येचा खुलासा, ५ आरोपीनां अटक
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीत रामटेक – तुमसर मार्गावरील नवरगाव परिसरातील टुरिस्ट धाब्यावर काम करणाऱ्या कुकची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याच्या घटनेचा आठ महिन्यांनंतर पोलिसांनी उलगडा केला. मृतदेह शेतात पुरला असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रतापसिंह महादेवसिंग बैस (ठाकूर) वय ५० वर्ष रा. आंबेडकरनगर, विले पार्ले, मुंबई, ह.मु. टुरिस्ट धाबा, नवरगाव असे मृतकाचे नाव आहे. टुरिस्ट ढाब्याचे मालक कैलास ठाकरे यांनी आपल्या नवरगाव शिवारातील शेतात एका व्यक्तीचा मृतदेह पुरल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान ढाब्यावर काम करणारे शिवराम मरकाम, धर्मराज वरठी आणि धीरज वानखेडे यांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाब्यावर काम करणारा कुक प्रतापसिंह महादेवसिंग बैस (ठाकूर) याचा मृतदेह शेतात पुरल्याचे समोर आले. त्यानंतर रामटेक पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करून शेतातून मृतदेह उकरून काढला. पुढील तपासात ढाबा चालक पियुष कैलास ठाकरे (वय २३) याने खून केल्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक प्रताप बैस हा वारंवार दारू पिऊन धाब्यावर शिवीगाळ करायचा. २० जुलै २०२५ रोजी त्याने मोबाईल चोरी केल्याचा आरोपही आरोपींनी केला होता. २६ जुलै २०२५ रोजी रात्री ढाब्यावर वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात पियुषने दोरीचा फास गळ्यात टाकून प्रताप बैस याला ठार मारले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ढाब्यावरील कर्मचाऱ्यांच्या (आरोपींच्या) मदतीने शेतात खड्डा खणून मृतदेह पुरण्यात आला. या प्रकरणी पियुष कैलास ठाकरे, वय २३ वर्ष, रा. नवरगाव २) कैलास माणिकराव ठाकरे, वय ५३ वर्ष, रा. नवरगाव ३) शिवराम पोतन मरकाम, वय ५० वर्षे रा.मु. नवरगाव कॉलनी, त. रामटेक जि. नागपुर, ४) धर्मराज ताराचंद वरठी, वय ४५ वर्ष, रा. आमगाव त. रामटेक जि. नागपुर ५) धिरज धनराज वानखेडे, वय ३७ वर्षे, रा. नवरगाव ता. रामटेक जि. नागपुर यांचेविरुध्द कलम १०३(१), २३८, ३(५) भारतीय न्याय संहीता २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोपनीय सूत्रामुळे आठ महिन्यापूर्वी घडलेल्या या खून प्रकरणाच्या उलगंडा पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास सुरू आहे.



