– महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, मनपा आयुक्त यांनी केला शुभारंभ
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील नागनदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तीनही नद्यांची पावसाळ्यापूर्व सफाई अभियानाला बुधवारी (ता ४) सुरुवात करण्यात आली. महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि मुख्य अभियंता मनोज तालेवार यांच्या उपस्थितीत अभियानांतर्गत येणाऱ्या नाग नदीची तर स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरा नदी येथून सुरुवात करण्यात केली. याप्रसंगी नगरसेवक सुधीर (बंडू) राऊत, सचिन नाईक, नगरसेविका सारिका नंदुरकर, नगरसेविका माया हाडे, नगरसेवक दिलीप दिवे, संजय उगले, ईश्वर ढेंगले उपस्थित होते.
महापौर निता ठाकरे यांनी सफाई अभियान सुरू करण्यापूर्वी विधिवत मशीनरीची पूजा करून अभियानाची सुरुवात केली. नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदींचा एकूण लांबी ४९.१७ किलोमीटर एवढी आहे. हे नदी सफाई अभियान १५ जून पर्यंत सुरू राहणार आहे.

नागपूर महानगरपालिकाद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांची सफाई करण्यात येते. नद्यांचे पात्र पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येतो. शहरातील नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ किमी आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. सध्या नदी स्वच्छता अभियानात ६ पोकलेन लावण्यात आले आहे.
अभियानांतर्गत नाग नदीच्या पात्राची सफाई केली जाणार आहे. त्यात अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौकातून सेंट झेव्हिअर स्कूल ते संघर्षनगर आणि पाच टप्प्यांत सफाई करण्यात येणार आहे. तसेच पिवळी नदीच्या पात्राची गोरेवाडा तलाव ते नारा दहन घाट आणि नारा घाट ते एसटीपी वांजरा या दोन टप्प्यात सफाई केली जाईल. पोहरा नदीच्या पात्राची सहकार नगर घाट ते बेलतरोडी पूल आणि बेलतरोडी पूल ते हुडकेश्वर पिपळा फाटा पूल या दोन टप्प्यात सफाई करण्यात येणार आहे. नदी सफाईचे कार्य सुनियोजित पद्धतीने व्हावे, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे तसेच स्वछता कार्य जलद गतीने व्हावे यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी मशीनरी लावण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. नदी आणि नाले सफाई करताना गाळ नदी पात्रात परत जाणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

नद्यांच्या पात्रात असलेला गाळाचा उपसा करून पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी काम केले जात आहे. यामुळे पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाहण्याची क्षमता वाढते व प्रवाहातील अडथळा दूर करता येते. तसेच खोल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये पुराचे पाण्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. यासाठी पोकलेन मशीन, टिप्पर जेसीबीचा वापर करण्यात येतो. याप्रसंगी महापौरांनी ज्या ठिकाणी नागरिकांच्या घरात नदीचा पाणी शिरते, त्या ठिकाणी नदीच्या सुरक्षा भिंती बांधणायचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच पावसाळ्यात ज्या ठिकाणी पावसाचा पाणी जमा होते, त्या स्पॉटची यादी देखील तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. या प्रसंगी गांधीबाग महल झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, कार्यकारी अभियंता सतीश गुरमुळे, प्रमोद लिखार, सचिन रक्षमवार, उप अभियंता संजय इंगले, राजेश तेलरांधे, मंगेश मुले, श्याम धर्माळी आणि इतर उपस्थित होते.








