spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर अधिक हिरवे; वृक्षसंख्या ३७ लाखांच्या उंबरठ्यावर

नागपूर :- उपराजधानी नागपूर शहर पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल करत असल्याचे चित्र समोर आले आहे. नागपूर महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या वृक्षगणनेत शहरातील झाडांची संख्या सुमारे ३७ लाखांपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, २०११ मध्ये झालेल्या वृक्षगणनेच्या तुलनेत हा आकडा तब्बल ७३ टक्क्यांनी वाढला आहे.

महापालिकेच्या प्राथमिक अहवालानुसार, लक्ष्मीनगर, नेहरूनगर आणि धंतोली हे विभाग सर्वाधिक हिरवळ असलेले क्षेत्र म्हणून समोर आले आहेत. शहरातील वाढत्या वृक्षसंख्येमुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास, तापमान नियंत्रणात ठेवण्यास तसेच जैवविविधतेच्या संवर्धनास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नागपूर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांकडून राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमा, नागरिकांचा वाढता सहभाग आणि पर्यावरणाबाबतची जागरूकता यामुळे शहरातील हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या आकडेवारीमुळे नागपूरकरांसाठी ही दिलासादायक आणि अभिमानाची बाब मानली जात आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा अहवाल शहराच्या हरित विकासाचा सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे.

Popular Articles