spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर महानगरपालिका ‘महिला उद्योजिका मेळावा २०२६’

– महिलांच्या उद्यमशीलता, सक्षमीकरण अन् सर्जनशीलतेचा भव्य उत्सव

नागपूर :- महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारा, महिलांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा आणि सक्षमीकरणाचा ठाम संदेश देणारा नागपूर महानगरपालिकेच्या ‘महिला उद्योजिका मेळावा २०२६’ चे भव्य स्वरूपात शनिवार ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रेशीमबाग मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत या सहा दिवसीय भव्य मेळाव्याचे करण्यात येत आले आहे. दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेदरम्यान उद्योग, कला, संस्कृती, प्रेरणा व मनोरंजन यांचा सुरेख संगम या मेळाव्यात पाहायला मिळणार आहे.

भव्य उद्घाटनाने शुभारंभ

शनिवार, ३१ जानेवारी रोजी या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन व महामार्ग, भारत सरकार यांच्या शुभ हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभास राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल, आमदार अँड. अभिजीत वंजारी, सुधाकर आडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाय तुमाने, संदीप जोशी, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मोहन मते, विकास ठाकरे, विभागीय आयुक्त  विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंघल, नासुप्र सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पद्मश्री शीतल महाजन तसेच लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सायंकाळी शिवानी जोशी म्युझिकल ग्रुप यांचा सुमधुर संगीत कार्यक्रम सादर होणार असून, तो संपूर्ण मेळाव्याची उत्साहपूर्ण सुरुवात करून देईल. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या देखरेखीत सदर आयोजन करण्यात आले आहे.

संस्कृती, कला व मनोरंजनाचा बहुरंगी कार्यक्रम

रविवार, १ फेब्रुवारी रोजी जल्लोष बँड यांचा जोशपूर्ण लाईव्ह म्युझिक कार्यक्रम रंगणार असून, देशभक्तीपर व लोकप्रिय गीतांच्या समूहगायनातून एकात्मतेचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

सोमवार, २ फेब्रुवारी रोजी समूह नृत्य सादरीकरणासह ‘उकळी’ ही एकांकिका सादर केली जाणार असून, नाट्यकलेतून सामाजिक आशय मांडला जाईल.

मंगळवार, ३ फेब्रुवारी हा दिवस मराठी रंगभूमीला समर्पित असणार असून, गाजलेला मराठी नाट्यप्रयोग ‘लागली पैज’ अनुभवी कलाकारांच्या सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी महिलांचा आत्मविश्वास, सक्षमीकरण आणि सामाजिक जाणीवा अधोरेखित करणारा भव्य फॅशन शो व रॅम्प वॉक आयोजित करण्यात आला आहे. ‘राणी मी होणार’ फेम अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांचे विशेष सादरीकरण हे दिवसाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यासोबतच रसिकार्पण डान्स ट्रूप यांचा नृत्याविष्कार कार्यक्रमाची शोभा वाढवेल.

प्रेरक व दमदार समारोप

गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी मेळाव्याचा समारोप प्रेरणा व कल्याणाच्या संदेशाने होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बिमला नेगी देओस्कर यांचे प्रेरणादायी व्याख्यान महिलांना नव्या उंचीवर पोहोचण्यासाठी दिशा देईल. त्यानंतर ‘बाधाओं परे’ या विषयावर ऋद्धी तहलरामानी यांची मानसिक आरोग्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

मेळाव्याचा समारोप ‘डीजे गर्ल प्ले इन साडी’ या अनोख्या डी.जे. सादरीकरणाने होणार असून, आधुनिक संगीत आणि भारतीय परंपरेचा सुंदर संगम महिलांच्या आत्मविश्वास व सक्षमीकरणाचे प्रतीक ठरेल.

नागपूर महानगरपालिकेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला ‘महिला उद्योजिका मेळावा २०२६’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, महिलांच्या स्वप्नांना व्यासपीठ देणारा, संधी निर्माण करणारा आणि समाजात सकारात्मक बदल घडवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. सर्व वयोगटातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी या भव्य मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles