spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हरीत भविष्यासाठी नागपूरकरांची सायकल स्वारी

– मनपाच्या सायकल मेरॉथॉन स्पर्धेला सायकलपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- जागतिक सायकल दिनानिमित्त नागपूरमध्ये पर्यावरण आरोग्य संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या मेरॉथॉन सायकल स्पर्धेला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आबालवृद्धांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून नागपूरच्या हरीत भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश आज दिला. या स्पर्धेला महापौर  निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, जागतिक किर्तीचे प्रसिद्ध सायकलपटू अमित समर्थ, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम, प्रभारी अतिरिक्त आयुक्त  मिलिंद मेश्राम, क्रीडा समिती सभापती दर्शनी धवड, आरोग्य समिती सभापती मनीषा अतकरे, लक्ष्मीनगर झोन समिती सभापती लक्ष्मी (तारा) यादव, शिवसेना (शिंदे) गट नेता गणेश चर्लेवार यांच्या उपस्थितीत सेंट उर्सुला शाळेच्या मैदानातून हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेची सुरूवात केली. महापौर निता ठाकरे यांनी फुगे हवेत सोडून शांततेचा संदेश दिला.

पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरात 5 जून ते 21 जूनपर्यंत विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे. याच साखळीत जागतिक सायकल दिनानिमित्त मनपाने 7 किलोमीटर अंतराची मेरॉथॉन सायकल स्पर्धा फिट इंडीया मुव्हमेंट, व्हाईस इंडिया, व इसाफ फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित केली होती. या स्पर्धेत विविध संघटनांचे प्रतिनिधी सामील झाले होते. या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, एनसीसी कॅडेट, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य, कॉटन मार्केटमधील सुभाष मंडळाचे सदस्य तसेच शहरातील तरुण हौसी सायकलपटू मोठ्या संख्येने सामील झाले होते.

सिव्हील लाइन येथील सेंट उर्सुला शाळांच्या मैदानात आज सकाळपासून सायकलपटूंचा ताफा जमा होऊ लागला होता. उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम व क्रीडा अधिकारी पियूष अंबुलकर ही स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी नियोजन करीत होते. यावेळी मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहायक आयुक्त सर्वश्री धनंजय जाधव विजय थूल, विकास रायबोले, प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता  राजेंद्र राठोड, अश्विनी येलचेटवार, राजेश दुफारे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. नरेंद्र बहिरवार , मुख्य अग्नीशमन अधिकारी तुषार बारहाते, एनडीएस प्रमुख विरसेन तांबे उपस्थित होते.

मनपा व फिट इंडियाचे लोगो असलेल्या टी शर्ट घालून सर्व सायकलपटू आपल्या सायकलने सकाळपासून सज्ज झाले होते. अनेकांनी हरीत नागपूरसाठी विविध प्रकारच्या वेशभूषा करून लक्ष आकर्षित करून घेतले होते.

इंधन बचतीसाठी सायकल वापरा- महापौर

या स्पर्धेला हिरवी दाखविण्यापूर्वी महापौर निता ठाकरे यांनी जागतिक सायकल दिनानिमित्त सर्व सायकलपटूंना शुभेच्छा दिल्या. तसेच हा दिवस आरोग्य संवर्धन पर्यावरण संरक्षण व इंधन बचत करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देणारा आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पश्चिम आशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर इंधन बचतीसाठी आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी जास्तीतजास्त सायकलचा वापर करून इंधन बचतीसाठी सर्वांनी सहयोग द्यावा, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले.

माननीय आयुक्त डॉ. विपीन यांनी सुद्धा पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन नागरिकांना केले.

झुंबा डांसने वार्म अप

सायकल स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी सायकलपटूंचे वार्मअप करण्यासाठी झुंबा क्लबच्यावतीने झुंबा नृत्याचे सेशन करण्यात आले. यात श्रद्धा ठाकूर व अपराजिता यांनी झुंबा डांस करीत असतांना डीजेच्या तालावर सायकलपटूंनी नृत्य केले. यात आबालवृद्धांपासून सर्वजण सामील झाले होते.

85 वर्षाचा युवा सामील

झुंबा डांस करीत असताना कॉटन मार्केटमधील सुभाष मंडळाचे श्रीपाद बुरडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वयातही ते सायकल चालवित असून या स्पर्धेत भाग घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी मंचावर पुशअप करीत युवकांना व्यायामाचे महत्‌व पटवून दिले. त्याचप्रमाणे केटीनगरचे श्री. रामभाऊ बोंदरे हे 77 वर्षांचे व्यक्तीने सुद्धा या स्पर्धेत सहभाग नोंदवून तरुणाईला सकारात्मक संदेश दिला.

आदिवासी क्रिकेटपटूंचा सत्कार

शहरातील 16 वर्षाखालील आदिवासी मुलींच्या क्रिकेट टिमच्या क्रिकेटपटूंना यावेळी व्हाईस इंडीयाच्या मदतीने सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून या मुलींनी क्रिकेटमध्ये नैपुण्य प्राप्त केले. याची दखल विदर्भ क्रिकेट असोशिएशनने सुद्धा घेतली. वंचित समाज घटकातील अमोली उईके, कुमुद धुर्वे, आरती धुर्वे, रिद्धीमा सोनवणे, संतोषी उईके, कल्पना उईके, जान्हवी उईके, नुपूर नैताम, प्राप्ती रामटेके व राणी गोऊकर यांना महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते सायकल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रिवान रिसायकल प्रा. लिमिटेड कंपनी तर्फे सत्ता पक्ष नेता  नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी रु.1 लक्ष चा धनादेश या मुलींच्या शिक्षणाकरिता दिला.

हरीत नागपूरसाठी संदेश

इंधन बचत व हरीत नागपूरचा संदेश देण्यासाठी सुजाता चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात 40 जणांचा एक पथक हिरव्या रंगात व सायकलवर इंधन बचतीचा संदेश लिहिलेले फलक घेतलेले होते. फिट रहेंगे हम, तभी विकसित होगा भारत, सायकल चलाए, इंधन बचाए, असे संदेश लिहिलेले फलक त्यांच्या सायकलवर हिरव्या फुलांनी सजविली होती. त्याचा हा गट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यात विवेक निमजे, अरुण राय, भानुदास लेकुरवाळे, सुधाकर ठाकरे, श्रीपाद भुरळे, अभिषेक बोबडे, आरती पासलकर, यांचा समावेश होता.

सर्वांना सहभागींना प्रशस्तीपत्र

ही स्पर्धा पूर्ण करणार्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्व श्री. विवेक निमजे, विजय गिराचे, अरुण राय, भानुदास लेकुरवाळे, सुधाकर ठाकरे, श्रीपाद भुरळे, सुजल राणे, अरुण रॉय, नितीन फुके, आरती पासरलकर, सुरेश उमाठे, मनोज जाधव, रितीका धनवी, श्रीमती सुजाता चतुर्वेदी यांच्यासह टायगर ग्रुप, ॲडव्हेंचर ग्रुप, माईस ॲण्ड मायनर, नेचर वॉरियर, एनसीसी ग्रुप , हॉक रायडर ग्रुप यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सायकल रॅलीमध्ये भगवान शंकराची वेशभुषा करून आलेल्या काव्यांश कोल्हे, तसेच भुलभुलया चित्रपटातील विशेष वेशभुषा करून आलेल्या स्पर्श लेंडे या लहान मुलांचा सत्कार महापौर यांच्या हस्ते करण्यात आला.

नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचा सक्रिय सहभाग

शहरातील नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी सुद्धा या सायकल स्पर्धेत सहभाग नोंदवून हरीत नागपूरसाठी कटिबद्ध असल्याचा संदेश दिला. संघटनेचे अध्यक्ष फारूक आकबानी, सचिव हेमंत सारडा, प्रसिद्ध उद्योजक बी. सी. भरतिया यांच्या सह त्यांचा 10 सदस्यांच्या गटाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला. संघटनेचे अध्यक्ष फारूक अकबानी यांनी महापौर निता ठाकरे, आयुक्त डॉ. विपीन यांचा सत्कार केला.

ऑपरेशन थंडर अंतर्गत जनजागृती करणाऱ्या युवकांचा संदेश

नागपूर पोलिसातर्फे राबविण्यात येत असलेल्या ॲन्टी ड्रग्स मोहिम ऑपरेशन थंडर अंतर्गत जनजागृती करणाऱ्या युवकांनी यावेळी ॲन्टी ड्रग्स चे मुखवटे घालून जनजागृतीचा संदेश दिला.

आरजे अमोलचे चित्तवेधक संचालन

शहरातील प्रसिद्ध आरजे  अमोल देशमुख यांनी या सर्व कार्यक्रमाचे अत्यंत आकर्षक पद्धतीने संचालन केले. जवळपास सात किलोमीटर अंतराची ही स्पर्धा करून सायकलपटू पुन्हा सेंट उर्सुला शाळेच्या मैदानात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.