यवतमाळ :- नेहरू महाविद्यालय, नेर येथे पार पडलेल्या शालेय विभागीय योगासन स्पर्धेत नंदानू योग केंद्र, यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी प्रभावी आणि कौतुकास्पद कामगिरी सादर करत केंद्राचा गौरव वाढवला. केंद्रातील आनंदी गणेश जोध, सिद्धी शैलेश चांदेकर, दियांश लकी झंवर, सर्वेश सागर दावडा, स्वरा उदय डाखोरे आणि लावण्य नरेंद्र भोयर या सात विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून दर्जेदार सादरीकरणे केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे मूल्यांकन समितीने केंद्रातील तीन विद्यार्थी — सिद्धी चांदेकर (आर्टिस्टिक पेअर), आनंदी जोध (आर्टिस्टिक पेअर) आणि दियांश झंवर (आर्टिस्टिक सिंगल) — यांची राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी निवड जाहीर केली असून ही स्पर्धा १ ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान संभाजीनगर येथे होणार आहे. या यशामागे नंदानू योग केंद्राचे योगगुरू प्रेमदास पकडे यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे अमूल्य सहकार्य मोलाचे ठरल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले. नंदानू योग केंद्र परिवाराने सर्व विद्यार्थी, पालक आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.








