spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

गडचिरोली :- सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली विनायक रा. जोशी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या वतीने दि. 13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली/अहेरी तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्ट प्रकरणे, भु-संपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे.

लोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीकरीता ठेवतांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. लोकन्यायालयाच्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाडयाची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यांमध्ये साक्षी- पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात 13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजीत आहे. तरी सर्वांनी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली ए.पी.खानोरकर यांनी केले आहे.

Popular Articles