spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या टोळीवर नवीन कामठी पोलिसांचा छापा

– धारदार शस्त्रे, मिरची पावडर, रस्सी व दुचाकीसह १ लाख १३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त; तिघे ताब्यात, दोघांचा शोध

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेरी–उनगाव मार्गावरील शेतशिवारातील झाडाझुडपांत दबा धरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा नवीन कामठी पोलिसांनी पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे आज पहाटे करण्यात आलेल्या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे धारदार हत्यारे, मिरची पावडर, रस्सी, कटर, मोबाईल आणि दुचाकीसह तब्बल १ लाख १३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपी घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले या दोन संशयितांचा शोध सुरू आहे.

२२ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० ते ५.३० वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने नेरी–उनगाव रोडवरील शेतशिवार गाठले. झाडाझुडपांमध्ये काही इसम संशयास्पदरीत्या दबा धरून बसल्याचे आढळून आले. पोलिसांनी सावधपणे परिसराची पाहणी केली असता संबंधित इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये नितेश मुलचंद लोंढे (२७), विक्की दीपक शेन्डे (३४) आणि सुजित चमन लोंढे (३८), तिघेही रा. सत्रापूर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन इसमांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

घटनास्थळाच्या झडतीदरम्यान पोलिसांनी लोखंडी धारदार विळा, कुर्‍हाड, कटर, लोखंडी सलाख, मिरची पावडरची पुडी, रस्सी, दोन मोबाईल फोन आणि हिरो एक्सट्रीम दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख १३ हजार १५० रुपये इतक्या किमतीची आहे.

या प्रकरणी सदर आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४), ३१०(५), भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून ही कारवाई परिमंडळ क्रमांक ६ चे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कामठी विभाग अंकुश खेळकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे, पोलीस हवालदार दीपक चोले, अनुप अढाऊ तसेच पोलीस अंमलदार नसीम अंसारी, नितेश नवघडे, आकाश टेकाम, सूरज अंबुलकर, धर्मपाल सहारे आणि आकाश मनवर यांच्या पथकाने केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.