यासीन शेख, गोंदिया :- विदर्भाचा मानबिंदू असलेल्या नवेगावबांध पर्यटन स्थळाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक रोजगाराला नवी दिशा देण्यासाठी आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी कंबर कसली आहे. नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत नवेगावबांधच्या नियोजनबद्ध विकासाचा कालबद्ध आराखडा (Master Plan) निश्चित करण्यात आला असून, यामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
उच्चस्तरीय बैठकीत विकासाचे मंथन
नवेगावबांध पर्यटन संकुलाचा विकास हा तुकड्या-तुकड्यात न होता एका ‘मास्टर प्लॅन’नुसार व्हावा, अशी आग्रही भूमिका आमदार बडोले यांनी मांडली होती. त्या अनुषंगाने दि. २४ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांच्या दालनात विशेष सभा पार पडली. या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मृगनाथन, प्रकल्प आराखडा इंजिनिअर सुनील तरोणे आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
काय आहे नवा विकास आराखडा? (ठळक वैशिष्ट्ये):
प्राणी संग्रहालयाचे पुनरुज्जीवन: १९९० पूर्वी या ठिकाणी असलेले वैभव पुन्हा मिळवण्यासाठी जुन्या ‘केजेस’चे नूतनीकरण केले जाईल. वन्यजीव अनुसूची (Schedule) १ ते ६ मधील प्राणी वगळून, इतर पशू-पक्षी आणि ‘डोमेस्टिक बर्ड्स’ (Domestic Birds) यांचे आकर्षक संग्रहालय या ठिकाणी साकारले जाणार आहे.
नैसर्गिक पायवाट व पर्यावरण शिक्षण: संपूर्ण संकुल परिसरातून एक ‘नॅचरल ट्रेल’ (नैसर्गिक पायवाट) तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यटकांना चालत फिरताना वनांचे महत्त्व आणि वन्य प्राण्यांच्या संवर्धनाचे धडे दिले जातील.
रोप-वे आणि मिनी ट्रेन: पर्यटकांचे मुख्य आकर्षण वाढवण्यासाठी हिल-टॉपपासून बोटिंग पॉईंटपर्यंत भव्य रोप-वे आणि तलावाच्या काठावरून निसर्गरम्य मिनी ट्रेन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.
नूतनीकरण आणि सौंदर्यवर्धन: ऐतिहासिक मनोहर गार्डनचे नूतनीकरण, रॉक गार्डन ते संजय कुटीपर्यंत नैसर्गिक दगडी रस्ता आणि दुतर्फा रॉयल पाम ट्री लावून परिसराचे सुशोभीकरण केले जाईल.
स्वागत द्वार व व्यावसायिक संधी: नवेगावबांध टी-पॉईंटवर जागतिक दर्जाचे स्वागत द्वार उभारून, स्थानिक लहान व्यावसायिकांसाठी ‘हॉकर्स झोन’ (व्यापारी गाडे) बांधले जातील, जेणेकरून स्थानिकांना थेट रोजगार मिळेल.
जगाच्या नकाशावर नवेगावबांधचे स्वप्न
नवेगावबांधचा ३००० एकरचा जलाशय आणि समृद्ध वनसंपदा हे गोंदियाचे वैभव आहे. १९९० नंतरच्या उदासीनतेमुळे हे वैभव काहीसे झाकोळले गेले होते. मात्र, आता आमदार बडोले यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी गोंदावले यांच्या नियोजनातून, निसर्गाची हानी न करता B.O.T. (Build-Operate-Transfer) तत्त्वावर या स्थळाचा विकास करून महसूल वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
या विशेष सभेमुळे नवेगावबांधच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार असून, हे स्थळ केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे. या नियोजित विकासामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा आता पल्लवित झाली आहे.
“नवेगावबांधचा विकास हा शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध आराखड्यानुसार व्हावा, हे माझे आणि प्रत्येक पर्यटन प्रेमीचे स्वप्न आहे. विशेषतः जुन्या प्राणी संग्रहालयाचे स्वरूप बदलून ते पुन्हा सुरू केल्याने पर्यटकांचा ओघ वाढेल. जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या या सकारात्मक चर्चेमुळे हा प्रकल्प आता निश्चित वेळेत पूर्णत्वास जाईल.”
– आमदार राजकुमार बडोले

