विधानभवनात झालेल्या बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांची मान्यता
प्रवीण दटके यांनी मानले मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांचे आभार
नागपूर १८ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरासाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या नजुल जमिनीसाठी विशेष अभय योजना राबवण्याचा निर्णय मार्च 2024 मध्ये घेण्यात आला होता.
नझुल भाऊ खंडधारकांना भूभाटक कर भरणे सोयीचे व्हावे म्हणून विशेष अभय योजना धोरण राबवावे अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषद सदस्य असतेवेळी 2024 मध्ये केली होती, त्यानुसार नझुल जमिनीसाठी अभय धोरण जाहीर करण्यात आले होते.
त्यामुळे दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्रचलित बाजार मूल्याच्या 2% रक्कम आकारण्याची विशेष अभय योजना लागू करण्यात आली . त्या अंतर्गत बाजार मूल्याच्या 2% रक्कम आकारून जमिनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्याची मोहीम नागपूर आणि अमरावती विभागात मागील वर्षभरापासून सुरू झाली. या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे , यामुळे सर्वसामान्य भूखंड धारक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परंतु सदर विशेष अभय योजनेची मुदत ही 31 जुलै 2025 रोजी समाप्त होणार आहे.
नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि शासनाला मिळत असलेला महसूल यांच्या तुलनात्मक तक्त्याची अवलोकन केले असता या योजनेला मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे ,असा आग्रह आमदार प्रवीण दटके यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत केला.
बाजारमूल्यावर आधारित 5 टक्के दर असताना वर्ष 2019 ते 2024 दरम्यान शासनास 9 कोटी महसूल प्राप्त झाला आणि विशेष अभय योजना लागू केल्यानंतर प्रचलित बाजारमूल्यावर 2 टक्के दराने वर्ष 2024 ते 2025 या एका वर्षात 24.65 कोटीचा महसूल शासनाकडे जमा झाला आहे, त्यामुळे ही विशेष अभय योजना शासनासाठी मोठा महसूल प्राप्त करणारी ठरली हे समजावून देण्यामध्ये दटके यांना यश आले.
त्यामुळे नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल जमिनीबाबत विशेष अभय योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी ही मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच महसूल विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या निर्णयाबद्दल प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले




