– महाराष्ट्रात प्रथमच ऐतिहासिक उपक्रम; पात्र लाभार्थ्यांना मिळाला कायदेशीर मालकी हक्काचा आधार
कामठी :- नगर परिषद कामठीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ऐतिहासिक पाऊल उचलत अतिक्रमित जागेवर वास्तव्यास असलेल्या पात्र लाभार्थ्यांना जमिनीच्या विधिवत नोंदणीकृत दस्तांद्वारे मालकी हक्क बहाल करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात प्रथमच पाच पात्र लाभार्थ्यांच्या नावावर जमिनीची अधिकृत नोंदणी करून त्यांना मालकी हक्काची कागदपत्रे प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कायदेशीर मालकी हक्काचा भक्कम आधार मिळाला असून, भविष्यात घरकुल योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास मोठी मदत होणार आहे.
तहसील कार्यालय, कामठी येथे झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार गणेश जगदाळे, मेरखेडे, नगराध्यक्ष अजय अग्रवाल ,नगर परिषद कामठीचे मुख्याधिकारी विनोद जाधव, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी, टाऊन प्लॅनिंग अधीक्षक दळवी, बांधकाम सभापती लालसिंह यादव, पाणी पुरवठा सभापती दिलीप बांडेबूचे ,नगरसेवक नीरज यादव, नागसेन गजभिये, विकास रंगारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




