spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शासकीय निवासी शाळा सरांडी येथे नवागत विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत; पाठ्यपुस्तके, स्टेशनरी साहित्य व गणवेशाचे वितरण

तिरोडा :- तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी (राजमाता जिजाऊ पब्लिक स्कूल सरांडी) येथे नवागत विद्यार्थिनींचे स्वागत, पाठ्यपुस्तके, स्टेशनरी साहित्य व गणवेश वितरण तसेच सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रजनी कुंभरे सभापती समाजकल्याण जि. प. गोंदिया होते. प्रमुख अतिथी अरुण गिरीपुंजे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती तिरोडा, अशोक बरईकर, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती तिरोडा, शाळेचे मुख्याध्यापक एन. एन. मेंढे तसेच एस. के. उंदीरवाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर व नवागत विद्यार्थिनींचे कुमकुमतिलकाने स्वागत करून झाली. त्यानंतर राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक एन. एन. मेंढे यांनी शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत नवागत विद्यार्थिनींचे स्वागत केले.

मार्गदर्शन करताना अशोक बरईकर यांनी विद्यार्थिनींनी थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांचे आचरण करावे, असे आवाहन केले. अरुण गिरीपुंजे यांनी विद्यार्थिनींनी आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, नियमित अभ्यास व शिस्त यांना जीवनात महत्त्व द्यावे, असा मौल्यवान संदेश दिला.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके, स्टेशनरी साहित्य व शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एस. के. उंदीरवाडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगत विद्यार्थिनींना प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन समाजात आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात रजनी कुंभरे यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, तसेच शासकीय सुविधांचा लाभ घेऊन उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रिती घरडे, मनोज कामडी, उमेश ढवळे, प्रवीण कौंडलकर, रेखा राठोड, मनीषा टेंभुर्णे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती घरडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन उमेश ढवळे यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.