-कामठी तालुक्यातील विक्रेत्यांचे एफएसएसएआयच्या आदेशाकडे अक्षम्य दुर्लक्ष
कामठी :- खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) दिले असतानाही कामठी तालुक्यातील अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ, फास्ट फूड व रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते अजूनही वर्तमानपत्रांचा वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एफएसएसएआयने वर्तमानपत्रांमध्ये खाद्यपदार्थ गुंडाळणे किंवा वाढणे यावर बंदी घातली आहे. कारण वर्तमानपत्र छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये विविध रसायने, कृत्रिम रंगद्रव्ये आणि शिशासारखे घातक घटक असतात. गरम व तेलकट पदार्थांच्या संपर्कात आल्यास ही रसायने अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता वाढते.
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे दूषित झालेल्या अन्नाचे दीर्घकाळ सेवन केल्यास पचनसंस्थेचे विकार, मूत्रपिंडांचे नुकसान तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
मात्र, शहरातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेते आणि रस्त्यावरील फास्ट फूड स्टॉलधारकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असून, संबंधित प्रशासनाकडूनही प्रभावी कारवाई होत नसल्याची नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या प्रकारावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.







