बेला :- विद्यार्थ्यांमध्ये दैनिक वृत्तपत्र वाचनाची सवय लागावी व त्यांच्यावर सुलेखनाचे संस्कार व्हावे या उद्देशाने वेद प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूरच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वृत्तवेध सुलेखन स्पर्धेच पुरस्कार वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यामध्ये नवरगाव येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेची रियांशी रोशन गमे व खेतापूर येथील प्रियांशी लक्ष्मण शेंडे या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेंटर पॉल स्कूलचे संचालक तथा यशवंतराव चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. राजा टांकसाळे होते. ज्येष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष महेश बंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्याचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक ,वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे ,विदर्भ साहित्य संघाचे सदस्य अनिल इंदाने प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धा वर्ग ५ ते ८ आणि ९ ते १२ या दोन गटात घेण्यात आली. त्यामध्ये नवरगाव येथील ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नवरगाव येथील शिक्षक तुळशीराम हुंगे खेतापुर येथील शिक्षिका अनुपमा हुंगे,विजय चिलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृत्ताचे सुलेखन केले. यशस्वीतेसाठी वसंत गोमासे, ओंकार पाटील ,शंकर जीवनकर, कृष्णा चावके ,डॉ. अश्विन किनारकर ,डॉ. शिल्पा सूर्यवंशी, वासंती गोमासे, डॉ अश्विनी देहाडकर, नंदा गिरडकर आणि कांचन मेश्राम यांनी सहकार्य केले.





