– प्रवाशांना उन्ह, वारा, पावसात उभे राहून करावी लागते बसची प्रतीक्षा
– ढीगभर नेते, पण कामाचा एकही नाही; मनसरच्या प्रवाशांचे हाल.
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीची सेवा आजही ग्रामीण भागासाठी महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा अधिकतर प्रवास हा एसटीवर अवलंबून असतो. रामटेक तालुक्यातील मनसर हे तालुक्याच्या मुख्य मार्गावरील एक महत्त्वाचे व अत्यंत वर्दळीचे गाव आहे. मनसरमार्गे रामटेक-नागपूर, पारशिवनी, देवलापार, खवासा (मध्यप्रदेश) तसेच नागपूर- रामटेक-तुमसर-गोंदिया या प्रमुख मार्गांवर राज्य परिवहन महामंडळाच्या व खासगी बसेस मोठ्या प्रमाणावर धावतात. परिणामी हक्काचा प्रवासी बसथांबा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. उन्हाळा व पावसाळ्यात विचित्र चित्र असते. मात्र, एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी आजतागायत प्रवासी बस थांबा उभारण्यात आलेला नाही. बसथांबा नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना उन्हात, पावसात आणि भरधाव वाहनांच्या धोक्यात रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे अपघाताचा धोका कायम असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे मनसर गावात माजी आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती यांच्यासह एक ज्येष्ठ समाजसेवक वास्तव्यास आहेत. याशिवाय सध्याचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आपल्या ताफ्यासह मनसरमार्गेच नियमित ये-जा करतात. एवढ्या लोकप्रतिनिधींची वर्दळ असूनही एका साध्या बस थांब्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत. बस थांबा उभारणीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा तोंडी व लेखी मागण्या केल्या. मात्र, आश्वासनांपलीकडे आजवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे “ढीगभर नेते आहेत, पण एकही कामाचा नाही,” अशी तीव्र व संतप्त प्रतिक्रिया आता उघडपणे व्यक्त होत आहे.तालुक्याच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या मनसरसारख्या महत्त्वाच्या गावाला बस थांबा नसणे हे केवळ गावाचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे दुर्दैव असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आता तरी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी जागे होऊन तातडीने प्रवासी बस थांबा मंजूर करून प्रत्यक्षात उभारावा, अशी जोरदार मागणी मनसरवासीयांकडून होत आहे.
“मनसरसारख्या वर्दळीच्या गावात आजपर्यंत प्रवासी बस थांबा नसणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना ऊन-पावसात रस्त्यावर उभे राहावे लागते. ढीगभर नेते असूनही साधा बस थांबा उभा राहू शकत नसेल, तर अशा नेतृत्वाचा उपयोग तरी काय?”
– रॉकी चवरे (ग्रामस्थ)




