तिरोडा :- सी. जे. पटेल महाविद्यालय, तिरोडा यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत बेलाटी बूज येथे ग्राम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या अनुषंगाने विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.
या ग्राम शिबिरात नलिनी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था, चांदोरी बुज चे संस्थापक प्रवीण खेडीकर यांना “व्यसनमुक्ती व युवा शक्ती” या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
मार्गदर्शन करताना खेडीकर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगत व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्याचे महत्त्व पटवून दिले. युवकांमध्ये असलेली ऊर्जा व क्षमता योग्य दिशेने वापरल्यास समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी ती निर्णायक ठरू शकते, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले. तसेच युवकांनी शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सकारात्मक कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजयभरत शर्मा , डॉ.किशन गावित NSS कार्यक्रम अधिकारी, प्रा. रवी चौधरी nss सहाय्यक कार्यक्रम अधिकारी. डॉ . महेश मेश्राम, प्रा.नितीन घमंडी,डॉ. इंद्रकला पांडे,डॉ. आरुषा पटले इत्यादी प्राध्यापकवर्ग व मोठ्या संख्येने NSS स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला व कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.




