spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हिंगणा एमआयडीसी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योगात औद्योगिक रासायनिक आपत्तीवरील ऑफसाईट आपत्कालीन मॉक ड्रिल

नागपूर :- गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखालील महासंचालक (NDRF) तसेच जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या निर्देशानुसार, लेवल-3 ऑफसाईट आपत्कालीन मॉकड्रिल महिंद्रा अँड महिंद्रा लि., एमआयडीसी हिंगणा, नागपूर येथे यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे औद्योगिक रासायनिक आपत्तीच्या प्रसंगी आपत्कालीन तयारी व समन्वयित प्रतिसाद यंत्रणा कितपत प्रभावी आहेत, याचे मूल्यांकन करणे होय.

मॉक ड्रिल परिदृश्य

या सरावामध्ये, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या गेट क्रमांक 3 जवळील 30 मेट्रिक टन क्षमतेच्या (दोन माऊंडेड बुलेट्स) प्रोपेन यार्ड मध्ये प्रोपेन गॅस गळती व त्यानंतर लागलेली आग असा प्रसंग निर्माण करण्यात आला. परिस्थिती वेगाने बिघडत गेली आणि कारखाना परिसरात 7 जण जखमी झाले. तसेच शेजारील व्यावसायिक व निवासी क्षेत्रात धोकादायक परिणाम दिसू लागले. या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाचा हस्तक्षेप व ऑफसाईट आपत्कालीन योजना सक्रिय करणे आवश्यक झाले.

सहभागी यंत्रणा

या मॉक ड्रिलमध्ये विविध आपत्कालीन व सहाय्यक यंत्रणांचा उत्साही सहभाग होता. त्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, एनडीआरएफचे कृपाल मुळे व 26 सदस्यांची टीम, एसडीआरएफचे 10 सदस्य, स्थानिक पोलीस विभागाचे 7 सदस्य, नागपूर महानगरपालिका, अग्निशमन वाहनासह 5 सदस्यांची टीम, एमआयडीसी अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहनासह 6 सदस्यांची टीम, आरोग्य विभागाचे सदस्य व 2 रुग्णवाहिका, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी, महिंद्रा अँड महिंद्रा आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका यांचा सहभाग होता.

मुख्य निरीक्षणे

हा सराव उत्साह, समन्वय आणि बांधिलकीने पार पडला. पथकांनी वेळेवर संपर्क, अग्निशमन, बचाव कार्य व वैद्यकीय मदत केली. जिल्हा व औद्योगिक आपत्कालीन यंत्रणा प्रभावीपणे सक्रिय झाल्या होत्या.

मार्गदर्शन व देखरेख

या सरावास डीआयएसएचचे अतिरिक्त संचालक (प्रभारी) जयंत मोहोरकर, उपसंचालक माधव रत्नपारखी, अभिजित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे संयंत्र प्रमुख नितीन वैद्य या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व देखरेख लाभली. या लेवल-3 ऑफसाईट आपत्कालीन मॉक ड्रिलद्वारे ठरवलेली उद्दिष्टे यशस्वीरीत्या साध्य झाली असून, नागपूर विभागातील औद्योगिक रासायनिक आपत्ती व्यवस्थापनासाठीची आपत्कालीन तयारी अधिक मजबूत झाली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.