spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्रावण मासनिमित्त 

आला… हसरा श्रावण
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे,
मराठी महिन्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना. या महिण्यापासूनच सणांची रेलचेल सुरु होते. ज्याची आपण सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतो. विशेषता स्त्रियांच्या आवडीचा आणि हवाहवासा वाटणारा हा श्रावण महिना. आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे बरेज सण असतात. त्यामुळे स्त्रियांना नटायला मिळते, हौसमौज करायला मिळते.
असा हा श्रावण महिना खूप फसवा असतो, ऊन पडले आहे असे म्हणता म्हणता पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागतात. श्रावणातील हा ऊनपावसाचा खेळ पाहून मन हरवून जाते. अवचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण आकाशाला एक वेगळीच शोभा आणते. पावसाच्या सरी कोसळू लागल्या की मोराला थुई थुई नाचायला प्रोत्साहन चढते. असा क्षण डोळयाच्या कॅमेरात टिपायचा अनुभव खूपच अविस्मरणीय असतो.
श्रावण म्हणजे काय असे कोणालाही विचारले तरी सर्वांच्या समोर निसर्गाचं मनमोहक रुप उभे राहते. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, अशी कितीतरी नावे.
श्रावण महिण्यात डोळयासमोर उभे राहतात ते सण, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण एकापाठोपाठ एक लागून येतात. खरं तर श्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे व्हायला लागतात.
हिरवा श्रावण हवाहवासा वाटणारा सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली असते. हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा, कुठे प्रसन्न हिरवा, तर कुठे पोपटी अशा रंगछटा सर्वत्र पाहायला मिळतात. श्रावणात वेली, वनस्पतींना नवीन पालवी फुटलेली असते. हे दृश्य पाहून असे वाटते की, जणू काही सृष्टीने नववधूचा वेशच धारण केला आहे. फळाफुलांनी वृक्षही बहरून गेलेले असतात. गवते आपली पिवळी कात टाकून हरित वस्त्रे परिधान करतात. अशा वातावरणात खूपच प्रसन्न वाटते. पावसाच्या सरी कोसळून गेल्या की, पक्षी आपले इवलाले पंख झटकून पिलांसाठी चारा आणायला घरट्याबाहेर पडतात.
‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ अशी पावसाची गाणी गुणगुणत पावसाच्या रिमझिम सरी अंगावर घेत लहान मुले चिंब भिजतात आणि आनंदाने उड्या मारतात. लहान मुले कागदाच्या होड्या करून पावसाच्या वाहत्या पाण्यात सोडतात. असा हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा ‘श्रावण महिना’ आहे. कारण पाऊस पडताच सर्वांना गरमागरम कांदा भाजी व चहा यांची मेजवानी मिळते. जर जास्त पाऊस झाला तर विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी मिळते त्यामुळे विद्यार्थीही खूप आनंदात असतात.
शेतकरी सुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावणसरींच्या स्पर्शाने आपल्या या शेतकरी बांधवाच्या शेतातील पिके आपल्याला आनंदाने डोलताना दिसतात. त्यावेळी आपल्या या शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतो.
श्रावणमास म्हणजे व्रतवैकल्यांचा आणि सणावारांचा महिना. श्रावणातील सोमवारांचे खूप माहात्म्य आहे यादिवशी बऱ्याच लोकांचा उपवास असतो. मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. तसेच शनिवारी मारुतीची आराधना केली जाते. या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्गबांधवांनाही विसरत नाही. म्हणून तर उंदरांपासून पिकांचे संरक्षण करणाऱ्या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते. तर नारळीपौर्णिमेला सागराला भक्तिभावाने नारळ अर्पण केला जातो.
श्रावणातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी स्त्रीपुरुष भाविक उपवास करतात आणि कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतात. श्रावणातील नवमीला बालगोपाल गोपाळकाला, दहीहंडी साजरी करतात. त्यानंतर येतो तो बैलपोळा. यालाच श्रावणी पोळा असेही म्हणतात. शेतकरी आपल्या बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा घालतात त्यांची सजावट करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवतात आणि सर्व गावकरी मिळून या बैलांची गावामध्ये मिरवणूक काढतात.
श्रावण महिना, एक पवित्र आणि उत्साहाचा महिना आहे. या महिन्यात धार्मिक कार्यांना महत्व आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात शांत आणि आनंदी जीवन जगण्याचा संदेश मिळतो.
सणासुदीची घेऊन उधळण
आला हसरा श्रावण
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
परंपरेचे करुया सर्व मिळून जतन
अनमोल ठेवा संस्कृतीचा राखूया आपण
आला हसरा श्रावण…..
              कविता फाले-बोरीकर 
                   माहिती व जनसंपर्क, कार्यालय
                                    नागपूर

Popular Articles