– १५ मे पर्यंत नियमित शुल्कात सह तर २० मे पर्यंत विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरता येणार
नागपूर :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षा जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणार असून ५ मे २०२६ पासून या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.mahahsscboardi.in या संकेतस्थळावर १५ मे पर्यंत नियमित शुल्कासह तर २० मे पर्यंत विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र- फेब्रुवारी -मार्च २०२६ परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी जाहीर झाला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जून- जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी , जून -जुलै २०२६ परीक्षेसाठी नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने कळविले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना www.mahahsscboardi.in या संकेतस्थळावर १५ मे पर्यंत नियमित शुल्कासह तर २० मे पर्यंत विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरता येणार आहे.
उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना आरटीजीएस /एनइएफटी द्वारे २१ मे २०२६ पर्यंत रक्कम भरता येणार आहे. विभागीय मंडळांना आरटीजीएस /एनइएफटी पावती व चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांद्वारे जमा करण्याची तारीख २५ मे २०२६ असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.