spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कृषी पुरस्कारांसाठी आता ऑनलाईन संगणक प्रणाली

Ø पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करावे

Ø जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांचे आवाहन

 यवतमाळ :- कृषी विभागामार्फत दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांना विविध पुरस्कार दिले जातात. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी कृषी विभागामार्फत स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित करण्यात येते.

यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे.

या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार,ऑफलाईन चार प्रतींमधील प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च वाचून प्रस्ताव सादरीकरण जलद गतीने होणार आहे,एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा-पुन्हा देण्याची आवश्यकता नाही,अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे,छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्च कमी होणार असून आर्थिक भार कमी होणार आहे.

आयुक्त कृषी यांनी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांना सन २०२५ पासूनच्या विविध कृषी पुरस्कारासाठीचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.