अलिबाग :- ऑनलाइन गेमिंग अॅपवर पैसे लावून खेळण्याच्या सवयीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका तरुणाने पैशांसाठी गंभीर गुन्हा केल्याची घटना खोपोलीत उघडकीस आली आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने शेजारी राहणाऱ्या ७१ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करून घरातील दागिने चोरल्याचा आरोप आहे. गुन्ह्यानंतर गोव्याला पळून गेलेल्या संशयिताला पोलिसांनी शोध घेऊन अटक केली आहे.
खोपोलीतील भानजाई परिसरातील एका इमारतीत माहेश्वरी रामचंद्रन पन्नीकर (वय ७१) या वृद्ध महिला एकट्याच राहत होत्या. १० नोव्हेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे हात-पाय बांधलेले होते. गळा आवळून तसेच डोके जमिनीवर आपटून त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले. घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याने ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
१२ तपास पथकांकडून शोधमोहीम
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार खोपोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची एकूण १२ पथके तयार करण्यात आली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध शक्यता तपासल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. अखेर संशयिताचा ठावठिकाणा गोव्यात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला तेथून अटक केली.
गेमिंगच्या नादात कर्जाचा डोंगर
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव यश मिनबहादूर थापा असे आहे. ऑनलाइन गेमिंग अॅपवर पैसे लावून खेळण्याची त्याला सवय होती. या खेळात आर्थिक नुकसान झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नात त्याने अनेकांकडून पैसे उसने घेतले. मात्र, कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग निवडल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
निमंत्रण देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश
पोलिसांच्या तपासानुसार, यश थापा याने माहेश्वरी पन्नीकर यांना लक्ष्य करण्याचे ठरवले. एका दुपारी आजीच्या वर्षश्राद्धाचे निमंत्रण देण्याच्या बहाण्याने तो त्यांच्या घरी गेला. त्यानंतर त्याने वृद्ध महिलेची हत्या करून घरातील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप आहे. चोरी केलेले दागिने त्याने राजेश जैन नावाच्या सराफाला विकल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यातून मिळालेली रक्कम घेऊन तो गोव्याला निघून गेला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला. अखेर गोव्यातून त्याला ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात चोरीचा ऐवज खरेदी करणाऱ्या व्यक्तीची भूमिका आणि इतर बाबींचा पोलीस पुढील तपास करीत आहेत.






