– जिल्हा परिषद शाळा पिपरी येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
कन्हान :- शहरातील जिल्हा परिषद शाळा पिपरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून प्रामुख्याने उपस्थित समाजसेवक प्रशांत मसार, मुख्याध्यापिका संध्या राऊत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करित अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
स्त्रियांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य आणि विचार स्वतःच्या आयुष्यात अमला त आणले पाहिजेत, तरच त्यांचे जीवनमान खऱ्या अर्थाने उंचावेल असे परखड मत समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांनी व्यक्त केले. आजची स्त्री तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकुन स्वतःची खरी ओळख हरवत आहे. एका बाजुला आपण आधुनिक होत आहोत, तर दुसऱ्या बाजुला अंधश्रद्धेच्या आहारी जात आहोत, ही चिंतेची बाब आहे. केवळ स्मृतिदिन साजरा करून किंवा फोटोला हार घालुन चालणार नाही. स्त्रियांनी आपले आत्मपरीक्षण करून सावित्रीबाईंनी सोसलेले कष्ट आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या वारशाचा सन्मान केला पाहिजे. जेव्हा स्त्री सावित्रीबाईंचे विचार आचरणात आणेल, तेव्हाच समाज प्रगतीपथावर जाईल, आजच्या काळात बाह्य रूपाला महत्त्व देण्या पेक्षा बुद्धी आणि कर्तृत्वाला महत्त्व द्या. सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारे उघडली, त्याचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करा. असा मोलाचा सल्ला प्रशांत मसार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी शिक्षक गेंदलाल बावनकुळे, शिक्षिका सरिता चोबितकर यांचे सह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.




