spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ओव्हरलोड रेती वाहतुकीचा फटका: गावराळा-मोहरणा मार्गावर चिखलाचे साम्राज्य, बस बंद असल्याने जनजीवन विस्कळीत

हंसराज,भंडारा लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रातील लिलाव झालेल्या रेती घाटांमधून मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या ओव्हरलोड रेती वाहतुकीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. अवजड ट्रकांच्या सततच्या वाहतुकीमुळे गावराळा–मोहरणा मार्गासह परिसरातील अनेक ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली असून, पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि पाण्याचे साचलेले डबके यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गावराळा–मोहरणा मार्गावर मोठ्या संख्येने रेतीचे ट्रक उभे असून, अनेक ट्रक चिखलात फसल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी या मार्गावरील बससेवा मागील काही दिवसांपासून ठप्प झाली असून, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाही संबंधित प्रशासन, महसूल विभाग आणि जबाबदार यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही ना ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात आहे, ना खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने गावराळा–मोहरणा मार्गाची पाहणी करून चिखलात अडकलेले ट्रक हटवावेत, बससेवा त्वरित पूर्ववत सुरू करावी, ओव्हरलोड रेती वाहतुकीवर कठोर कारवाई करावी आणि खराब झालेल्या रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रमुख मागण्या :

– गावराळा–मोहरणा मार्गावरील अडकलेले ट्रक तातडीने हटवावेत.

– ओव्हरलोड रेती वाहतुकीवर कठोर कारवाई करावी.

– बंद पडलेली बससेवा त्वरित सुरू करावी.

– खराब झालेल्या ग्रामीण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.

– रेती वाहतुकीवर प्रभावी नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास ग्रामीण भागातील जनजीवन आणखी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Popular Articles