– पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…!
यवतमाळ :- राज्य पोलीस दलात सध्या कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक { API } हे पद कायमस्वरूपी रद्द करून पोलीस उपनिरीक्षक { PSI } यांची डायरेक्ट पोलीस निरीक्षक { PI } पदी पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की ,सध्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक { API } या पदाच्या उल्लेख पोलीस कायद्यामध्ये कोठेही करण्यात आलेला नाही. भारतातील कोणत्याही राज्यातील पोलीस दलात तसेच केंद्र शासनातील केंद्रीय पोलीस बल , रेल्वे पोलीस { RPF } , केंद्रीय राखीव पोलीस दल { CRPF } , इत्यादी पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक { API } हे पद कोठेही कार्यरत नाही. त्या ठिकाणी फक्त पोलीस शिपाई { PC } , पोलीस हवालदार { HC } , असिस्टंट सब इन्स्पेक्टर { ASI } , आणि सब इन्स्पेक्टर / उपनिरीक्षक { SI } या पदांची निर्मिती असून PSI च्या पुढे पुढील म्हणजेच PI / DYSP वगैरे पदोन्नती दिली जाते.

तर महाराष्ट्र पोलीस दलातील कायद्यानुसार / नियमावलीनुसार पोलीस शिपाई { PC } , पोलीस हवालदार { HC } , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक { ASI } ,आणि पोलीस उपनिरीक्षक { PSI } या प्रमाणे पदांची निर्मिती असून सहाय्यक पोलीस निरीक्षक { API } या पदाचा विनाकारण समावेश केला गेला आहे , जे की पोलीस कायद्यात या पदाचा कोठेही उल्लेख नाही.
सध्या महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक { PSI } यांना कमीत कमी 7 ते 8 वर्षांनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक { API } पदी पदोन्नती दिली जाते आणि त्या नंतर परत 7 ते 8 वर्षांनंतर पोलीस निरीक्षक { PI } पदी पदोन्नती देण्यात येते , त्यामुळे 7 ते 8 वर्षांचा त्यांचा पदोन्नतीचा काळ विनाकारण वाया जातो आणि या काळात काही अधिकारी सेवानिवृत्त होतात व त्यांचे पुढील पोलीस निरीक्षक { PI } , पोलीस उपअधीक्षक { DYSP } बनण्याचे स्वप्न अधुरेच राहते.
त्यामुळे पोलीस बॉईज असोसिएशनच्या या निवेदनाची दखल घेऊन गृहमंत्री साहेबांनी आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी असे म्हटले आहे, यावेळी हे निवेदन देताना पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे , पोलीस बॉईज असोसिएशनचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शाहिद सय्यद , शहराध्यक्ष – प्रशिक गडलिंग , विकास शेळके ,क्रांतिदूत सेवानिवृत पोलीस कल्याणकारी असोसिएशनचे यवतमाळचे दिनकर चौधरी , दयानंद मिश्रा , जनार्दन मढावी , विजय यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.




