spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बावनथडी पात्रात अवैध रेती उपशावर पोलिसांचा छापा; ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

– गोबरवाही पोलिसांची मोठी कारवाई; दोन ट्रॅक्टरसह लोडर जप्त, आरोपींवर गुन्हे दाखल.

हंसराज, प्रतिनिधी भंडारा गोबरवाही :- बावनथडी नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा आणि वाहतूक करणाऱ्या टोळीवर गोबरवाही पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन ट्रॅक्टर आणि एका लोडरसह एकूण ४६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी गोबरवाही पोलीस स्टेशनचे पथक परिसरात गस्त घालत असताना, मौजा कवलेवाडा गावाजवळील बावनथडी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी पंचासह तातडीने नदीपात्रात छापा टाकला. यावेळी दोन ट्रॅक्टरमध्ये लोडरच्या साहाय्याने रेती भरली जात असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच लोडर चालक वाहन घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र पोलिसांनी दोन ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतले.

• सुनील ताराचंद पुराम (वय ३७, रा. धुटेरा, ता. तुमसर) – महिंद्रा युवो ट्रॅक्टर (MH 36 AR-0539) चालक/मालक.

• लक्की देवदास पाचे (वय २३, रा. हरदोली, जि. बालाघाट, म.प्र.) – स्वराज ट्रॅक्टर (विना क्रमांकाचा) चालक/मालक.

• मनीष ठाकरे (वय ३२, रा. मोहगाव, जि. बालाघाट, म.प्र.) – जॉन डिअर लोडर (MP 50 ZH-2654) चालक (पसार आरोपी).

पोलिसांनी या कारवाईत प्रत्येकी ८ लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर (१६ लाख), १२ हजार रुपये किमतीची २ ब्रास रेती आणि ३० लाख रुपये किमतीचा एक लोडर, असा एकूण ४६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३(५), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ (८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७, ९ अन्वये गुन्हा (अ.क्र. २२/२०२६) नोंदवण्यात आला आहे.

सदर कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार बांते, पोलीस हवालदार पेदाम व गोबरवाही पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहेत.

Popular Articles