spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजकीय पक्ष व उमेदवारांनी जाहिरात प्रसारणासाठी पूर्वप्रमाणन करणे आवश्यक

नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता प्रचार, प्रसिध्दीकरीता राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. यामध्ये आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे व मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचार, प्रसार व्हावा या करिता आयोगाच्या दि.०९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ‘निवडणूकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम सनियंत्रण व जाहीरात प्रमाणन आदेश २०२५’ या अधिसूचनेनुसार नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात येत आहे.

या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका स्तरीय माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. निवडणूकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षास अथवा उमेदवारास दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, युट्युब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खाजगी एफ.एम.वाहिन्या, सिनेमागृह, सार्वजनिक ठिकाणचे ऑडिओ – व्हिज्युअल डिस्प्ले, ई-वृत्तपत्रे, बल्क एसएमएस, व्हॉईस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे अशा कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जाहिरात प्रसारित / प्रसिध्द करावयाची असल्यास त्या प्रस्तावित जाहिरातींचे समितीकडून ‘पूर्वप्रमाणन’ म्हणजे ‘प्रसिध्दी अथवा प्रसारणापूर्वी मान्यता घेणे’ आवश्यक आहे. पूर्वप्रमाणन केले नसल्यास त्या जाहिरातीचे प्रसारण / प्रसिध्दी करता येणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. जाहिरात पूर्वप्रमाणनासाठी जाहिरात प्रसारित / प्रसिध्द करावयाच्या दिनांकापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान ५ दिवस आधी समितीकडे ‘परिशिष्ट – 4’ नुसार अर्ज करावयाचा आहे. अर्ज नमुना प्रत सिव्हील लाईन्स स्थित नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती निरीक्षण कक्षामध्ये उपलब्ध आहे. ते अर्ज त्याच ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह जमा करावयाचे आहेत. अर्जासोबत प्रसारित करावयाचे जाहिरातीच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रती या 2 पेन ड्राईव्हमध्ये, राजकीय पक्षाच्या पदाधिका-याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या 2 मुद्रित प्रतींसह (प्रिंट) जमा करावयाच्या आहेत. निवडणूकविषयक जाहिरातींवर राजकीय पक्षाने खर्च केला असल्यास त्याचा समावेश पक्षाच्या; तर उमेदवाराने खर्च केला असल्यास त्याचा समावेश उमेदवाराच्या निवडणूक खर्चात करणे आवश्यक आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, खालील स्वरूपाच्या आशयाचा समावेश असलेल्या जाहिराती प्रसारित / प्रसिद्ध करता येणार नाहीत व अशा स्वरुपाच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणनही केले जाणार नाही याची विशेष नोंद घ्यावयाची आहे. यामध्ये –

(क) भारतीय संविधानाची पायमल्ली, केंद्र/ राज्य शासनाच्या कायद्यांचे उल्लंघन,

(ख) राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांची पायमल्ली,

(ग) धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, पेहराव इत्यादींच्या आधारे तेढ अथवा शत्रुत्वाची शक्यता,

(घ) प्रार्थना स्थळांचे छायाचित्र / छायाचित्रणाचा समावेश,

(ङ) कायदा व सुव्यवस्थेला आव्हान, हिंसेला प्रोत्साहन, शांततेचा भंग,

(च) न्यायालयाचा अथवा एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेची बदनामी,

(छ) देशाच्या ऐक्याला, सार्वभौमत्वाला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा.

(ज) अन्य कुठल्याही देशावर टिका, अवमानजनक टिप्पणी अथवा तिरस्कार पूर्ण विधान,

(झ) संरक्षण दलाच्या अधिकारी / कर्मचारी अथवा संरक्षण दलाचे छायाचित्र / छायाचित्रण,

(ञ) राजकीय पक्ष, राजकीय नेता किंवा अन्य कोणावरही खोटे आरोप,

(ट) कुठल्याही राजकीय नेत्याच्या अथवा व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप,

(ठ) नीतिमत्ता व सभ्यतेचे उल्लंघन,

(ड) अश्लिलतेला प्रोत्साहन, अशा बाबींचा समावेश आहे. जाहिरात बनविताना व त्या प्रमाणनासाठी पाठविण्यापूर्वी वरील बाबींची खात्री करून घ्यावी, जेणेकरून कालापव्यय होणार नाही असे सूचित करण्यात येत आहे. तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त अन्य भाषेतील प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन करण्यासाठी अर्ज सादर करताना संबंधित भाषेतील जाहिरातीच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील दोन प्रती द्याव्यात. त्याचबरोबर त्या जाहिरात संहितेचा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत अनुवाद करून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रित प्रती (प्रिंट) जोडाव्यात. त्यासोबत “सदर प्रस्तावित जाहिरातीचा मराठी/ हिंदी / इंग्रजी भाषेत यथार्थ अनुवाद करण्यात आला असून, कोणत्याही चुकांकरिता अर्जदार जबाबदार असेल, असे निश्चयपूर्वक कथन करण्यात येत आहे,” असे नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र ‘परिशिष्ट- ५’ प्रमाणे सादर करणे आवश्यक असेल.

प्रस्तावित जाहिरात पूर्वप्रमाणनाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो कार्यालयीन कामकाजाच्या ३ दिवसांच्या आत संबंधित समिती निकालात काढेल. अर्ज निकाली काढताना समिती, जाहिरातीचा कोणताही भाग वगळेल अथवा फेरबदल करेल किंवा दुरूस्ती सूचवेल त्यानुसार कार्यवाही करणे संबंधित राजकीय पक्ष उमेदवार/अर्जदारावर बंधनकारक असेल. प्रस्तावित जाहिरातीचे संबंधित समितीने पूर्वप्रमाणन केले नसल्यास, अशा जाहिरातीचे प्रसारमाध्यमांना प्रसारण / प्रसिद्धी करता येणार नाही.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.